पिंपळनेर : पिंपळनेर ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येत असलेल्या शासकीय नियमांची अंमलबजावणीत कसूर केल्याबद्दल दोन दूध विक्रेत्यांवर पाचशे रुपये प्रमाणे दंड करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी डी़ डी़ चौरे यांनी दिली़कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने स्थानिक पातळीवर काही अधिकार ग्रामपंचायतकडे राखून ठेवले आहेत़ त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने गावात काही नियम आखले आहेत़ पाच दिवस संपूर्ण गाव बंद होते़ कोणतेही दुकान सुरू नव्हते़ याला अपवाद फक्त औषध विक्रेते होते़ संबंधित ग्रामपंचायतीने दिनांक १५ एप्रिल पासून एका दिवसासाठी सायंकाळी चार ते नऊ वाजेपर्यंत किराणा दुकानांना योग्य अंतर राखून विक्रीची परवानगी दिली आहे तसेच दूध व्यवसायिकांना घरपोच दूध विक्रीची परवानगी असताना स्वामी दूध विक्री चिकसे व डेरी फार्म मालपूर हे गर्दी करून दूध विक्री करीत असताना १४ एप्रिल रोजी पाच वाजता आढळून आले़ त्यांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड करण्यात आला व दंडाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात येणार आहे़ साक्री तालुक्यात कोरोना संसर्गजन्य रुग्ण आढळून आल्याने ग्रामपंचायतीने धडक कारवाई करणे सुरू केले आहे़ कोणी उल्लंघन केल्यास कारवाई होईल, असे ग्रामविकास अधिकारी चौरे यांनी स्पष्ट केले़
दोन दुधविक्रेत्यांना ठोठावला दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 10:27 PM