लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत जिल्ह्यात २७ मार्चपर्यंत वैयक्तिक शौचालय बांधकामांचे ९८.२६ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यात साक्री व शिरपूर तालुक्यात प्राप्त उद्दिष्टांपैकी वैयक्तीक शौचालयांची कामे पूर्ण झाली आहेत. तर धुळे व शिंदखेडा तालुक्यात तब्बल ४ हजार ६२६ कामे अद्याप प्रलंबित आहेत. ही कामे ३१ मार्चच्या आत पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाला जोर लावावा लागणार आहे. अशा परिस्थितीत ही कामे येत्या पाच दिवसात पूर्ण होतील, असा दावा जि.प. प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. जिल्ह्यासाठी १ लाख शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट जि.प. प्रशासनाला २०१७-१८ या वर्षात १ लाख २५ हजार ३० वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट होते. त्यानुसार फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यात ९८ हजार ११२ वैयक्तिक शौचालये बांधण्यात आली होती. आता साक्री व शिरपूर तालुक्यातल वैयक्तीक शौचालयांची १०० टक्के कामे ही पूर्ण झाली आहेत. तर धुळे तालुक्यात ४ हजार ४ व शिंदखेडा तालुक्यात ६२२ कामे ही अपूर्ण आहेत. ही कामे प्रगतीपथावर आहे. शिंदखेडा तालुक्यातील वैयक्तीक शौचालयांची शिल्लक कामे येत्या दोन दिवसात पूर्ण होतील, अशी माहिती जि.प. प्रशासनाने दिली आहे.
धुळे तालुक्यात सर्वाधिक कामे प्रलंबित स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तीक शौचालयांसाठी प्राप्त उद्दिष्टांपैकी धुळे तालुक्यातील ११२ ग्रामपंचायतींमध्ये सर्वाधिक ४ हजार ४ कामे ही अपूर्ण आहेत. तर शिंदखेडा तालुक्यातील १११ ग्रामपंचायतींमध्ये ६२२ कामे ही प्रलंबित आहेत. या ग्रामपंचायतींतर्गत वैयक्तीक शौचालयांची कामे प्रगतीपथावर आहे. तर साक्री तालुक्यातील १४६ ग्रा. पं. व शिरपूर तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतींमध्ये वैयक्तीक शौचालयांची कामे ही पूर्ण झाली आहे.