लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानासह जलसंधारणाच्या कामात लोकसहभाग सर्वात महत्त्वाचा आहे. लोकांनी या उपक्रमांमध्ये सहभाग नोंदविला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री यांनी शनिवारी सकाळी ११ वाजता बुराई नदी परिक्रमा बाभुळदे येथे पोहचली, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात केले. रविवारी सकाळी शिंदखेडा येथे या पाचदिवसीय बुराई नदी परिक्रमेचा समारोप होणार आहे. तालुक्यातून वाहणारी बुराई नदी बारमाही प्रवाहित करण्यात येणार आहे. त्यासाठी १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून या नदीवर ठिकठिकाणी २४ बंधारे बांधण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री रावल यांनी गेल्या बुधवारपासूून साक्री तालुक्यातील दुसाणे येथून बुराई नदी परिक्रमेला सुरूवात केली आहे. या परिक्रमेचा शनिवारी चौथा दिवस होता. आज सकाळी चिमठाणे, ता.शिंदखेडा येथून परिक्रमेला सुरूवात झाली. सकाळी ११ वाजेच्या सुमारास परिक्रमेचे बाभुळदे गावात आगमन झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमास दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन दुसाने आदी उपस्थित होते. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चिमठाणे येथील पुतळ्याला अभिवादन करून राज्याचे रोहयो व पर्यटन जयकुमार रावल यांनी चिमठाणे गावापासून आपल्या बुराई परिक्रमेच्या चौथ्या दिवसाचा प्रारंभ केला. दरखेडा बंधा-याचे भूमिपूजन बुराई नदीपात्रात दरखेडा येथे बांधण्यात येणाºया बंधा-याचे भूमिपूजन मंत्री रावल यांच्याहस्ते आज झाले. या वेळी लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. बुराई नदी परिक्रमा आटोपल्यावर तापी-बुराई योजनेचा आढावा घेण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.चौथ्या दिवशी निशाणे, महाळपूर, बाभुळदे, अलाणे, चिरणे, कदाणे, परसामळ या गावांमध्ये प्रबोधन करत रात्री उशीरा ही परिक्रमा कुमरेज, ता.शिंदखेडा येथील गायत्री धाम मंदिरात पोहचली. गेल्या चार दिवसांमध्ये सुमारे ४८ कि.मी.चे अंतर पूर्ण झाले आहे. चौथ्या दिवशी बुराई नदी परिक्रमेचा मुक्काम कुमरेज, ता.शिंदखेडा येथ राहणार आहे. ही परिक्रमा पाचव्या दिवशी रविवारी सकाळी ७.३० वाजता कुमरेज येथून शिंदखेडा शहराकडे मार्गस्थ होईल. तेथून पुढे पाटण येथील बंधाºयाचे भूमिपूजन करून मंत्री जयकुमार रावल शिंदखेडा येथील गांधी चौकात होणा-या बुराई नदी परिक्रमा समारोपाच्या कार्यक्रमास उपस्थित राहतील. गेल्या पाच दिवसांत साक्री व शिंदखेडा या दोन्ही तालुक्यांमध्ये बुराई संवर्धनासंदर्भात या उपक्रमाद्वारे जनजागृती करण्यात आली. दोन वयोवृद्धांचा उत्स्फूर्त सहभागपरिक्रमेच्या चौथ्या दिवसाचे वैशिष्ट म्हणजे चिरणे-कदाणे येथील ९५ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक गैंधल भोई व ८० वर्षीय लकडू पाटील या दोन्ही वृद्धांनी मंत्री रावल यांच्यासोबत परिक्रमेत ७ कि.मी. अंतरापर्यंत प्रवास करून बुराई नदी परिक्रमेत आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यांच्या प्रतिसादामुळे आपणास ऊर्जा व आशीर्वाद मिळाले, अशी भावना मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली.बुराई परिक्रमेत रोज अनेक संघटना सहभागी होत असून शुक्रवारी गांगेश्वर मंदिर ते चिमठाणेपर्यंत महिलाही सहभागी झाल्या. त्यात वैशाली मिलिंद महाजन, वैशाली प्रवीण महाजन, इंदिरा रावल, अलका राजपूत, यांच्यासह अनेक महिलांनीही सहभाग नोंदविला.