ऑनलाईन लोकमत
पिंपळनेर, दि.12 - गेल्या वर्षी लोकसहभागातून शहरातील पांझरा नदीकिनारी जॉगिंग ट्रॅक तयार करण्याचा निर्णय झाला होता. परंतु, सद्य:स्थितीत या जॉगिंग ट्रॅकमध्ये तयार करण्यात येणा:या रस्त्याच्या मंजुरीसाठी तांत्रिक अडचणी येत असल्याने जॉगिंग ट्रॅकच्या कामाला ब्रेक लागला आहे.
पिंपळनेर शहरात करमणुकीसाठी उद्यान नाही. ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी नाना-नानी पार्कही नाही, अशी परिस्थिती असताना लोकसहभागातून शहरातील पांझरा नदीच्या पूर्वेला नदीकिनारी लोकसहभागातून जॉगिंग ट्रॅक तयार करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला होता. ग्रामपंचायत व दमंडकेश्वर लॉन्स येथे बैठक घेण्यात आली. विशेष, म्हणजे जून 2016 मध्ये या कामाचा शुभारंभही झाला होता. मात्र, त्यानंतर या कामाला ब्रेक लागला आहे.
8 लाख 94 हजार रुपये खर्च
लोकसहभागातून जॉगिंग ट्रॅकचे काम सुरू झाल्यानंतर पांझरा नदी पुलाखाली असलेल्या शिवकालीन बंधा:यातून मोठय़ा प्रमाणात गाळ काढण्यात आला. तसेच येथील परिसरात सपाटीकरणही करण्यात आले. या संपूर्ण कामासाठी तेव्हा 8 लाख 94 हजार रुपये खर्च आला होता.
रस्त्याच्या मंजुरीसाठी अडचण
नियोजन आराखडय़ानुसार जॉगिंग ट्रॅकमध्ये जो रस्ता तयार केला जाणार आहे, त्या रस्त्याच्या मंजुरीसाठी अडचणी येत आहे. याबाबत शहरातील एका शिष्टमंडळाने पालकमंत्री दादा भुसे यांचीही भेट घेतली होती. तेव्हा जॉगिंग ट्रॅकच्या ठिकाणी संरक्षण भिंतीसाठी निधीची मागणी करण्यात आली होती. परंतु, हा निधी अद्याप मिळालेला नाही. प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनीही सुरुवातीला जॉगिंग ट्रॅकच्या कामाची पाहणी केली. तेव्हा त्यांनी निधी उपलब्ध करून देईल, असे आश्वासनही दिले होते. परंतु, त्यानंतर पाठपुरावा न झाल्याने या कामाला ब्रेक लागला आहे.