मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर-सुराय रस्त्याची संततधार पावसामुळे पार दुरवस्था झाली आहे. गुरुकुल इंग्लिश स्कूलसमोरील फरशी पूल तुटला असून मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे हा रस्ता धोकेदायक बनला असून येथे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.मालपूरसह परिसरात सध्या जोरदार पाऊस सुरु असून नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. २० जुलैच्या झालेल्या पावसामुळे येथील मालपूर-सुराय रस्त्यावरील सुराय चौफुलीजवळ गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या समोरील पाईप टाकलेला पूल अर्धवट वाहून गेला आहे. त्याची डागडुजी होणे गरजेचे आहे. मात्र, बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे पुलावरील रस्ता सततच्या पावसामुळे अधिकच खचला असून रस्त्यात मोठा खड्डा पडल्याने हा रस्ता धोकेदायक बनला आहे.या रस्त्यावरुन सुराय-चुडाणे- अक्कलकोस तसेच खर्दे, वरझडी येथून दुधाची वाहतूक सुरु असते. तसेच शाळकरी मुलांची या रस्त्यावरुन वर्दळ सुरु असते. रस्त्यात पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे वाहन उलटून दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळेस खड्डा निदर्शनास न आल्यास दुचाकीस्वार या खड्ड्यात पडण्याचा धोका आहे. बांधकाम विभागाने त्वरित येथे मुरुमचा भराव करुन रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी सुराय, चुडाणे, अक्कलकोस येथील नागरिकांकडून होत आहे.
मालपूर-सुराय रस्त्यात पडला खड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 11:46 AM