लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : गेल्या पावसाळ्यात अक्कलपाडा मध्यम प्रकल्पात वाढीव जलसाठा करण्यात आल्याने प्रकल्पास लागून असलेल्या शेतांमध्ये पाणी शिरून झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे आता सातबारा उताºयांनुसार करण्यात येत आहे. सर्व माहिती संकलित झाल्यानंतर नुकसान भरपाईबाबत एकत्रित प्रस्ताव लवकरच तापी पाटबंधारे महामंडळास सादर केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. गतवर्षी आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे अक्कलपाडा प्रकल्पात प्रथमच ९० टक्के जलसाठा करण्यात आला होता. त्यामुळे हा साठा वाढत असताना प्रकल्पालगतच्या शेतांमध्ये पाणी शिरले. परिणामी उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकºयांनी या नुकसानीच्या भरपाईची मागणी केली होती. परंतु पंचनामे करण्यास पोहचलेल्या कृषी सहायक, पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता व तलाठी यांना सैयदनगर, इच्छापूर येथे विरोध दर्शविल्याने पंचनामे होऊ शकले नव्हते. जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्या अध्यक्षतेत नुकतीच या संदर्भात बैठक झाली. झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्याचवेळी होणे गरजेचे होते. परंतु शेतकºयांच्या विरोधामुळे त्यास उशीर झाल्याने शेतकºयांचे सातबारा उतारे मिळवून त्यावर नमूद पिकांच्या मूल्यांकनाद्वारे भरपाईचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कृषी व पाटबंधारे विभागाने कार्यवाही सुरू केली असून लवकरच एकत्रित प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. साक्री तालुक्यातील दातर्ती येथे प्रकल्पाच्या पाण्यामुळे डाळिंब पिकाचेही नुकसान झाले असून त्याचे पंचनामे सुरू आहेत. पुढील आठवड्यात ते काम पूर्ण होईल, असे सूत्रांनी सांगितले. वाढीव जलसाठ्यामुळे झालेल्या नुकसानीचा फटका प्रकल्पबाधित क्षेत्रातील सुमारे २००च्या वर शेतकºयांना बसला आहे. किती हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले याचा अंदाज अद्याप यंत्रणेला बांधता आलेला नाही. प्रकल्पात यापुढे वाढीव जलसाठा केला जाणार आहे. यंदा ९० टक्के साठा करण्यात आला. त्यामुळे नजीकच्या शेतांमध्ये पाणी शिरले. तसे या पुढे होऊ नये, याकरिता आवश्यक ठरलेले भूसंपादन केले जाणार आहे. त्याचेही काम लागलीच हाती घेण्यात आले होते. ते झाल्यानंतर अंतिम रेषा मारून भूसंपादनाचा अंदाज आला असता. परंतु शेतकºयांनी विरोध केल्याने ते कामही पूर्ण होऊ शकले नव्हते. त्यामुळे आता हे काम मॅन्युअली पूर्ण करण्यात येत असून ते झाल्यानंतर भूसंपादनाचा प्रस्ताव दिला जाणार आहे.