मालपूर : शहरी भागाकडुन ग्रामीण भागात कोरोना ने विळखा घालायला सुरुवात केली आणि खेड्यापाड्यावर दिवसभर भटकंती करुन सुया, पोत, दामन, कंगवा, आरसा विकणाऱ्या वैधु समाजाच्या लोकांच्या संसाराची दैनाच झाली़ सध्या त्यांना गावात प्रवेश करणे देखील जिकिरीचे झाले आहे.या वस्तू कुठे विकाव्या व पोट कसे भरावे हा मोठा प्रश्न या वर्गाच्या लोकांना पडला आहे़ आत्मनिर्भर कसे व्हावे यासाठी सध्या संघर्ष सुरू असल्याचे चित्र ग्रामिण भागात दिसुन येत आहे. गावोगावी हिंडुन गरिबांची कटलरी डोक्यावर घेवुन फिरणारे वैधु समाजाचे जगणे कोरोना काळात मुश्किल झाले आहे. हा वर्ग दिवसभर फिरुन या वस्तू रोख स्वरूपात विकुन अन्यथा भाकरी वर देवुन आपली गुजरान करत असतात. प्रसंगी वेळ झाला तर ज्या गावात विक्रीसाठी जातात त्याच गावात दिवसभर फिरुन रात्री जिल्हा परिषदेच्या शाळेच्या ओट्यावर मुक्काम करतात. हा दिनक्रम कोरोनाने सर्वच बदलुन टाकला. सध्या गावात प्रवेश मिळणे मुश्कील झाले आहे. कन्टेंमेन्ट झोनमुळे मर्यादा आल्यात. तर काही गावात सतत भटकंती करत असल्यामुळे कोरोनाच्या भितीमुळे आमच्याकडुन कोणी वस्तू खरेदी करत नसल्यामुळे जगणे मुश्किल झाले असल्याचे ते सांगतात़ हातावर पोट असणाºया अशा गरीबांची कटलरी डोक्यावर घेवुन फिरणाऱ्यांचे सर्वाधिक हाल होताना दिसुन येत आहे. कोरोनाने हातावरील भाकरी देखील हिरावून नेल्यामुळे या वर्गाचे हाल होत आहेत.कोरोनामुळे आम्हाला काही गावातील सरपंच, पोलीस पाटील गावात पाय देखील ठेवू देत नाही. आता खूप हाल झाले असून काही दिवस उपाशी रहावे लागते. लहान मुलांसाठी आजुबाजूला भाकरी मागावी लागते. कधीच एवढे वाईट दिवस बघायला मिळाले नव्हते. ते आता बघत आहे.- राजेश गुरू वैधू
वैधु समाजातील लोकांच्या संसाराची होतेय दैना़
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 10:27 PM