धुळे : शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात प्लॉटधारक महिलेच्या नावाने तोतया महिला उभी करून प्लॉट खरेदीचा प्रयत्न झाला. हा प्रयत्न सहायक दुय्यम निबंधक स्नेहलता पाटील यांच्या जागरुकतेमुळे फसला. याप्रकरणी चार संशयितांविरोधात शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
देवपुरातील सर्व्हे नंबर ८२/१ यातील प्लॉट नंबर ४३ चे क्षेत्र १८० चौरस मीटर याचा विस्तारित सिटी सर्व्हे नंबर ३००० क्षेत्र १५६,४० चौरस मीटर हा बखळ प्लॉट सम्राटनगर साक्री रोड येथे राहणाऱ्या शकुंतला रामकृष्ण पाटील (वय ६५) यांच्या नावाने आहे. मात्र, हा प्लाॅट बनावट कागदपत्रे सादर करून विक्री करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील सह दुय्यम निबंधक वर्ग २ यांच्या कार्यालयात तीन जण आले. प्लॉटची मूळ मालक शकुंतला पाटील यांच्या जागेवर तोतया महिलेला उभी करून प्लॉटचा गैरव्यवहार केला जात होता. हा प्रकार बुधवारी दुपारी ४ ते ५ वाजेच्या सुमारास घडला. मात्र ही महिला तोतया असल्याची शक्यता गृहीत धरून दाखल कागदपत्रांवी तपासणी व चौकशी केली असता हा प्लॉट शकुंतला पाटील यांचा असल्याचे समोर आले. होणारा प्लॉटचा व्यवहार खोटा असल्याचे लक्षात येताच व्यवहार थांबविण्यात आला.
बेकायदेशीर व्यवहार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहायक निबंधक स्नेहलता पंढरीनाथ पाटील (वय ५३, रा. श्रीराज अपार्टमेंट, गोळीबार टेकडी रोड, धुळे) यांनी शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली. त्यानुसार, मनोहर दिगंबर मोरे (वय ५२, रा. गल्ली नंबर १२, सुभाषनगर, जुने धुळे) याच्यासह २ पुरुष आणि एक तोतया महिला अशा चार जणांविरोधात भादंवि कलम ४२०, ४६५, ४६७, ३४ सह नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८२ व ८३ प्रमाणे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक दंडिले करीत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.