लोकमत न्युज नेटवर्क, धुळे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी असलेल्या सिल्वासामध्ये २५ एप्रिल रोजी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी नागरिकांच्या वाहतुकीसाठी महाराष्ट्रातील विविध भागातुन सोमवारी ७०० बसेस सिल्वासा येथे रवाना झाल्या. या बसेस महाराष्ट्रातुन विना प्रवासी गेल्या असल्या तरी, येण्या-जाण्याचे भाडे व तेथील वाहतुकीच्या भाड्यापोटी महामंडळाच्या तिजोरीत कोट्यावधींचे उत्पन्न मिळणार आहे.
पंतप्रधानांच्या येथील सभेसाठी लाखो नागरिक येणार असल्यामुळे तेथील प्रशासनाने या नागरिकांच्या वाहतुकीसाठी महाराष्ट्र शासनाकडे एसटी महामंडळाच्या बसेस पुरविण्याबाबत मागणी केली होती. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने लागलीच एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सिल्वासा येथे बसेस पुरविण्याच्या सुचना केल्या होत्या.
त्यानुसार राज्य परिवहन महामंडळातर्फे सिल्वासा येथे राज्यातील ठाणे, पालघर, रायगड, सिंधदुर्ग, नाशिक, धुळे, जळगाव या भागातुन ७०० बसेस सिल्वासा येथे पाठविण्यात आल्या आहेत. सोमवारी सकाळी त्या-त्या विभागातील बसेस सिल्वासा येथे रवाना झाल्या असल्याचे सांगण्यात आले.चालक-वाहकांसह वाहतुक विभागाचे अधिकारी व यांत्रिक विभागाचे अधिकारींही बसेससोबत सिल्वासा येेथे गेले आहेत. दरम्यान, सिल्वासा येथील वाहतुकीतुन एसटी महामंडळाला करोडो रूपयांचे उत्पन्न मिळणार आहे. दरम्यान, या बसेस सेल्वासा येथुन महाराष्ट्रात परतल्यानंतरच उत्पन्नाचा आकडा समजणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी `लोकमत`शी बोलतांना दिली.
तर खान्देशला मिळाले ६० लाखांचे उत्पन्न..
सेल्वासा येथील सभेसाठी खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार येथुनही एसटी महामंडळाच्या बसेस सोमवारी रवाना झाल्या. यात जळगाव जिल्ह्यातील विविध आगारातुन ५४ बसेस तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यातुन एकुण ७३ बसेस रवाना झाल्या आहेत. यात जळगाव विभागाला २७ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे तर धुळे विभागाला ३३ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. एकूण ६० लाखांचे उत्पन्न महामंडळाला मिळाले आहे. दरम्यान, सभा झाल्यानंतर बुधवारी दुपारपर्यंत या बसेस परतणार असल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"