लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : येथील जिल्हा कारागृहावर बॉम्ब फेकणार असल्याची माहिती औरंगाबादहून धुळे कंट्रोल रुमला धडकताच पोलीस क्षणार्धात ‘अलर्ट’ झाले़ क्षणाचाही विलंब न करता शहर पोलीस निरीक्षकांसह श्वान पथक, बॉम्ब शोधक पथक आणि पोलीस कर्मचाºयांनी जिल्हा कारागृह गाठले़ अडीच ते पावणे तीन तास तपासणी सुरु होती़ अखेर ही अफवा ठरली असलीतरी कारागृहाच्या बाहेर मात्र पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता़ औरंगाबाद येथील पोलीस कंट्रोल रुमला कोणीतरी एका इसमाने मोबाईलवरुन संपर्क साधत धुळे कारागृहावर बॉम्ब फेकणार आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर तेथील पोलीस यंत्रणेने धुळे कंट्रोल रुमला या घटनेची माहिती दिली़ बॉम्ब फेकणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर कंट्रोल रुमने शहर पोलिसांना या गंभीर अशा घटनेची माहिती दिली़ लागलीच शहर पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांनी श्वान पथक, बॉम्ब शोधक पथकाला कळविले आणि तात्काळ कारागृहाजवळ येण्याच्या सुचना केल्या़ अवघ्या काही मिनीटांत यंत्रणा अलर्ट झाली़ पोलीस निरीक्षक चौधरी यांनी या घटनेची माहिती कारागृह अधीक्षक वैभव आगे यांना प्रत्यक्ष जावून कळविली आणि सुरु झाली तपासणी़दुपारी साडेतीन वाजेला फोन कॉल आल्यानंतर सर्व यंत्रणा सज्ज झाली़ कारागृहाच्या बाहेर सुरुवातीला कसुन तपासणी झाल्यानंतर पथकाने कारागृहातील आतमध्ये प्रवेश केला़ याठिकाणी सर्व भागात कसून तपासणी करण्यात आली़ सायंकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत तपासणी सुरुच होती़ त्याचवेळेस अग्नीशमन बंबाला देखील पाचारण करण्यात आले होते़ पण, विशिष्ठ वेळेपर्यंत तपासणी झाल्यानंतर बॉम्ब कुठेही नाही हे समजल्यानंतर अग्नीशमन बंबाला पुन्हा माघारी पाठविण्यात आले़ शहर पोलिसांच्या पथकाने कारागृहाजवळ येताच परिसरात लावण्यात आलेल्या लोटगाड्या तात्काळ हटविल्या़ रस्ता मोकळा केला़ कारागृहाबाहेर जमा होत असलेली गर्दी पोलिसांनी पांगविली़ याठिकाणी बंदोबस्त कायम होता़ ज्या मोबाईलवरुन हा औरंगाबाद येथे कॉल आला तो मिळविण्यात आला आहे़ नंबरच्या चौकशीसंदर्भात सायबर सेलला माहिती कळविण्यात आली आहे़ लवकरच ही माहिती मिळेल अशा विश्वास आहे़ त्यानंतर लागलीच संबंधिताची चौकशी करुन कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती शहर पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले़ दरम्यान, ही अफवा ठरली असलीतरी पोलिसांचा बंदोबस्त लावला असल्याचे त्यांनी सांगितले़
धुळे कारागृहावर बॉम्ब फेकण्याचे कळताच पोलीस ‘अलर्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 10:33 PM