धुळे : तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा राजीनामा आणि ३० टक्के शुल्क माफिची मागणी करीत धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा ताफा अडविणाºया विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला़ अचानक झालेल्या आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती़ आंदोलन करणाऱ्यांपैकी ६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिली़ दरम्यान, हे विद्यार्थी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंधित आहेत़कोरोनाचा फटका शैक्षणिक वर्तुळाला बसला आहे़ शैक्षणिक संस्थांनी मागील मागील वर्षाचे निकाल घोषीत करुन आॅनलाईन प्रक्रिया सुरु केली आहे़ रद्द झालेल्या परीक्षेबाबत मुल्यांकन करुन गुण द्यावेत असे राज्य शासनाने सांगितले आहे़ मुल्यांकनात अनेक विद्यार्थी नापास झाले आहेत़ त्यामुळे असहमत विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकन लवकरात लवकर करावे, कोरोनामुळे परीक्षाच झाल्या नाही तर परीक्षा शुल्क का? असा स्वाभाविक प्रश्न निर्माण होत आहे़ त्यामुळे द्वितीय सत्राच्या परीक्षेचे शुल्क त्वरीत परत करावेत, मार्च ते जून महिन्यातील वसतिगृह, खानावळ शुल्क, बस शुल्क शंभर टक्के परत करावेत़ यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत १० टक्के प्रवेश शुल्क घेऊन प्रवेश प्रक्रिया सुरु करावी आणि उर्वरीत शुल्क चार टप्प्यात घेण्यात यावे़ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या एकूण शुल्कापैकी ३० टक्के शुल्क सरसकट माफ करावे़ अशी विद्यार्थी परिषदेची मागणी होती़ या मागणीसाठ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांकडे वेळ मागितली होती़ मात्र, ती मिळाली नाही़दुपारी १२ वाजेच्या सुमारास पालकमंत्री अब्दुल सत्तार हे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बैठकीसाठी येत असल्याचे पाहून विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी स्टेट बँकेच्या मुख्य शाखेजवळ ठिय्या मांडला़ गाडी येताच हे रस्त्यावरच झोपले़ तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांनी घोषणाबाजी केली़ पोलिसांनी विनंती करुन देखील विद्यार्थी हटायला तयार नसल्याने पोलिस त्यांना उचलून न्यायला लागले़ त्यावेळी देखील विरोध करण्यात आला़ त्यामुळे पोलिसांच्या क्युआरटी पथकाने बळाचा वापर केला़ आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पांगविण्यासाठी लाठीहल्ला देखील करण्यात आला़ त्यानंतर पालकमंत्र्यांची वाट मोकळी करुन देण्यात आली़ या आंदोलनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश सहमंत्री विराज भामरे, संयोजक प्रताप श्रीखंडे, शहरमंत्री निलेश गिळे, भावेश भदाणे, मोहन भिसे, नयन माळी, राजेंद्र पाटील, गंगाधर कोमनवार यांच्यासह अन्य पदधिकाºयांचा समावेश होता़ पोलिसांनी सहा विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे़ अशी माहिती शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिली़
पालकमंत्र्यांचा ताफा अडविणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 4:57 PM