लोकमत आॅनलाईन धुळे - येथील महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान घेण्यात येत असून दुपारी चार वाजेपर्यंत ३७.८४ टक्के मतदान झाले. संध्याकाळी प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र असून त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या १९ प्रभागातील ७४ जागांसाठी ३५५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सत्ताधारी राष्टÑवादी व कॉँग्रेस यांची आघाडी असून भाजप, शिवसेना स्वबळावर लढत आहेत. भाजपने सत्ताधारी राष्टÑवादी कॉँग्रेसपुढे आव्हान उभे केल्याने मोठी चुरस दिसून येत आहे. मात्र आज सकाळी मतदानासाठी एरव्ही मतदारांच्या ज्या रांगा लागतात, त्याच्या उलट चित्र दिसून आले. परंतु मुस्लिम बहुल भागातील केंद्रांवर मात्र सकाळपासून मोठ्या रांगा लागल्याचे पहावयास मिळाले. दुपारी ४ वाजेपर्यंत ३७.८४ टक्के मतदान झाले होते. आता केंद्रांवर मोठ्या रांगा लागल्या असून २० ते २५ टक्के वाढीची शक्यता गृहीत धरता एकूण टक्केवारी ५५ ते ६० टक्क्यांपर्यंत पोहचेल, असा अंदाज बांधला जात आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत अपवाद वगळता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून संवेदनशील केंद्रांवर संध्याकाळी होणारी मतदारांची गर्दी लक्षात घेऊन बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.