सुनील साळुंखे
शिरपूर :मुंबई-आग्रा महामार्गावरील पळासनेर गावाजवळ इंदूरहून पुण्याकडे बटाटे घेऊन जाणारा ट्रक उलटल्याची घटना गुरूवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. ट्रक उलटल्याने, रस्त्यावर बटाटेच बटाटे विखुरले होते. सुदैवाने या अपघातात चालक आणि क्लिनर किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सांगवी पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली.
गुरूवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास इंदूरकडून पुण्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकचे (क्रमांक एमपी-०९-एचएच-५७७७) ब्रेकफेल झाल्यामुळे पळासनेर गावाजवळील चौफुलीजवळ गतीरोधकावर आदळून ट्रक उलटला. सुदैर्वाने त्या अपघातस्थळाजवळ अवघ्या १-२ मिनीटापूर्वीच मजूरी काम करणाऱ्या १०-१२ महिला निघून गेल्यामुळे मोठा अनर्थ टळला़ ट्रक उलटताच गाडीतील २१ टन बटाटे भरलेल्या गोण्या रस्त्यावर येवून पडल्यात़ त्यामुळे रस्त्यावर बटाटेच बटाचे विखरले होते.
अपघाताची माहिती सांगवी पोलिस व महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झालेत़ या अपघातात ट्रक चालक जागोरशहा शहीन शहा व सहचालक हैदर शहा (रा.इंदूर) हे किरकोळ जखमी झालेत़ बटाटे पुणे येथे घेवून जात होते़ काहीवेळानंतर क्रेन आणून उलटलेला ट्रक उचलण्यात आला.