धुळे - राज्य सरकार व वीज कंपनी व्यवस्थापनाने कोरोनाकाळात कार्यरत असलेल्या वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंते व कंत्राटी कामगारांना फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा दिलेला नाही. शासनाने वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा द्यावा व इतर प्रमुख चार मागण्यांसाठी सोमवारपासून काम बंद आंदोलन करणार असल्याची माहिती कृती समितीचे बी.एन.पाटील यांनी दिली.
कोरोनाच्या काळात वीज कर्मचारी अविरत सेवा देत आहेत. अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला, तसेच काही कर्मचाऱ्यांचे मृत्यूदेखील झाले आहेत. तरीही वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा शासनाने दिलेला नाही. सर्व कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइनचा दर्जा द्यावा. कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांचे प्राधान्याने लसीकरण करावे, संघटनांसोबत चर्चा न करता महामारीच्या काळात मेडिक्लेमच्या टी.पी.ए मध्ये केलेला बदल मागे घ्यावा, कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कामगारांच्या वारसांना ५० लाखांची मदत करावी व कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने वीज बिल वसुलीची सक्ती करू नये, आदी मागण्या कृती समितीने केल्या आहेत. कामबंद आंदोलन करणार असल्याबाबत कृती समितीने ऊर्जामंत्री नितीन राऊत व राज्य शासनाला अवगत केले असल्याचे सांगण्यात आले.