लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शिंदखेडा तालुक्यातील खलाणे येथील जवान योगेश भदाणे हा शहीद झाल्याचे वृत्त कळाल्यापासून गावात जणू दु:खाची संक्रात कोसळली आहे. ग्रामस्थांचे डोळे आपल्या लाडक्या योेगेशच्या पार्थिवाकडे लागले आहेत़ वायपूर रोडवर ज्या ठिकाणी अंत्यविधी होणार त्या स्थळी तयारी सुरू करण्यात आली आहे. सोमवारी दुपारी त्याच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत़ अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ जम्मू-काश्मिर येथे पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात शिंदखेडा तालुक्यातील खलाणे येथील जवान योगेश मुरलीधर भदाणे (२८) हा शहीद झाला़ हे वृत्त खलाणे गावात धडकताच गावात शोककळा पसरली़ योगेश भदाणे याचे येथील एमएचएसस महाविद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे़ पुढे त्याने विज्ञान शाखेतून पदवी संपादन केली़ सैन्यात भरती होण्याची इच्छा असल्याने त्याचे त्यासाठी प्रयत्न सुरु होते़ औरंगाबाद येथे २००९ मध्ये तो सैन्यात भरती झाला. सध्या तो इंजिनिअर रेजिमेंट या विभागात कार्यरत होता़ पारोळा तालुक्यातील मंगरुळ येथील प्रिया हिच्याशी १७ फेब्रुवारी २०१७ मध्ये त्याचा विवाह झाला होता. योगेश हा शहीद झाल्याचे वृत्त शिंदखेडा तालुक्यातील खलाणे गावात दूरचित्रवाहिन्यांद्वारे पोहचताच गावावर शोककळा पसरली़ ग्रामस्थांनी त्याच्या घराभोवती गर्दी केली होती़ त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी प्रिया, योगिता व पुनम या दोन बहिणी असा परिवार आहे़ विशेष म्हणजे त्याचे मोठे मेहुणेही सैन्यात कार्यरत आहेत़ एकुलता असल्याने तो सर्वांचा आवडता होता़ शनिवारी रात्री उशीरापर्यंत जि.प. सदस्य कामराज निकम व त्यांचे सहकारी थांबून होते. त्यांनी तयारीचा आढावा घेतला. गावामध्ये ग्रामपंचायतीतर्फे प्रत्येकाने आपल्या अंगणात स्वच्छता ठेवून रांगोळ्या काढून शहीद जवानाच्या अंत्ययात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. योगेश शहीद झाल्याचे त्याच्या कुटुंबीयांना अद्याप सांगण्यात आलेले नाही, असे सांगण्यात आले. खलाणे गावाचा सुपुत्र योगेश भदाणे हा जवान शहीद झाला आहे़ त्याचा मृतदेह खलाणे गावात सोमवारी आणण्यात येणार आहे़ त्याच्या निधनामुळे गावावर शोककळा पसरली आहे़ त्याच्या अंत्यविधीची तयारी खलाणे गाव आणि प्रशासनामार्फत करण्यात येत आहे़ गावालगत वायपूर रस्त्यावर बिसा भिकन फकीर यांच्या शेतजमिनीवर त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत़योगेश हा माझा बालपणीचा मित्र होता़ पहिली पासुन ते बारावी पर्यंत आम्ही सोबत होतो़ तो शाळेत हुशार आणि फार कष्टाळू होता. शाळा सुटल्यानंतर पाच वाजता शेतातील कामे करुन रात्री अभ्यास तो करायचा़ सकाळी परत शेतातील काम करुन शाळेत जायचा, असा त्याचा नित्याचा दिनक्रम होता. लहानपणापासुनच त्याला सैन्यात जाण्याची आवड होती. मागील तीन महिन्यापुर्वी सुटीत आपल्या खलाणे गावात तो आला होता. त्यावेळी देखील शेतात आपल्या आई वडीलांना त्याने मदत केली होती, असे योगेशचा मित्र दत्तू पाटील यांनी सांगितले़
शहीद योगेश भदाणे यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 12:27 PM
जिल्हा प्रशासनाची माहिती, खलाणे गावावर शोककळा
ठळक मुद्देजवान योगेश भदाणे जम्मू-काश्मिर येथे शहीद खलाणे गावात पसरली शोककळासोमवारी योगेशच्या पार्थिव देहावर होणार अंत्यसंस्कार