लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कसदार सादरीकरण... उत्कृष्ट संवाद... सादर केलेल्या एकपात्री अभिनयाला मिळालेली टाळ्यांची उत्स्फूर्त दाद.. अशा उत्साही वातावरणात आज स्टॅन्ड-अप कॉमेडी स्पर्धा पार पडली. यात सुजय भालेराव (धुळे) यांनी विजेतपद तर प्रविण माळी (शिरपूर) यांनी उपविजेतेपद मिळविले.सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे महाराष्टÑाचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यावर आधारित एकपात्री अभियन स्पर्धा झेड. बी. पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात झाली. १२ वर्षे आणि त्यापुढील वयोगटातील स्पर्धकांसाठी ही स्पर्धा होती. स्पर्धेचे उदघाटन नटराज पूजन व दीपप्रज्वलनाने झाले. स्पर्धकांनी पु.ल. देशपांडे यांच्या साहित्यावर आधारित एकपात्री अभिनय सादर केले. यात बहुतांश स्पर्धकांनी ‘ती फुलराणी’, ‘बटाट्याची चाळ’, ‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकातील साहित्यावर आधारित एकपात्री अभिनय सादर केले. उत्कृष्ट संवाद, कसदार सादरीकरणाने अनेकांना भुरळ घातली. विनोदी वाक्यांनी अनेकांना हसविले.स्पर्धेत प्रविण माळी, मिहिर पाटील, अमित सोलंकी, मुकेश पवार, नितीन शेणगे, प्रियंका पवार,अथर्व कुंभारे, घनश्याम पाटील, वेदश्री अहिरराव, सिद्धेश बाविस्कर, सुजय भालेराव, डॉ. मनीषा भावसार यांनी सहभाग घेतला. सुजय भालेराव यांनी बटाट्याची चाळ मधील ‘उपवास’ हा प्रसंगी सादर करीत दाद मिळविली. तर प्रविण माळी यांनी ‘पुढारी’पाहिजे हा प्रसंग सादर केला. प्रत्येक सादरीकरणाला दाद मिळाली होती.यात सुजय भालेराव यांनी विजेतेपद तर प्रविण माळी यांनी उपविजेतेपद पटकावले. विजेत्यांना उपप्राचार्य डॉ. सी.एन. पगारे, डॉ. मिलिंद दुसाने यांच्याहस्ते पारितोषिक वितरित करण्यात आले. रोख रक्कम व प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप होते. परीक्षक म्हणून प्रा. अनिल सोनार (धुळे), प्रा. अनिल कोष्टी (भुसावळ), श्यामसुंदर राजपूत (औरंगाबाद) यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन प्रा.भाग्यश्री पाटील यांनी केले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साहित्याचे वाचन व्हावे हाच उद्देशमोबाईलमुळे वाचन संस्कृती काही प्रमाणात कमी झालेले आहे. आजच्या पिढीने वाचन केले पाहिजे, पु.लं.चे साहित्य गावागावापर्यंत पोहचले पाहिजे या उद्देशाने ही एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे उपप्राचार्य डॉ. सी. एन.पगारे यांनी सांगितले. अशा स्पर्धांमधून चांगले कलाकार तयार होत असतात असेही ते म्हणाले. तर पुस्तक वाचन हाच या स्पर्धेचा उद्देश असल्याचे प्रा. अनिल सोनार म्हणाले.