ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.27- काही दिवसांपूर्वी धुळे दौ:यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांडपाणी व्यवस्थापन, पिण्याचे पाणी व घनकचरा व्यवस्थापन हे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याबाबत सूचित केले होत़े त्यानंतर मनपाने या तीनही कामांना चालना दिली असून घनकचरा व्यवस्थापनाचा प्रस्ताव तांत्रिक मंजूरीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास सादर करण्यात आला आह़े
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पांझरा नदीपात्रात झालेल्या जाहीर सभेत सांडपाणी व्यवस्थापन व प्रक्रिया, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि घनकचरा व्यवस्थापन हे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत, त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असा शब्द दिला होता़ त्यानंतर मनपा प्रशासनाकडून हे तीनही प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़
राज्याच्या अर्थसंकल्पात धुळे शहर भुयारी गटार योजनेसाठी अर्थात सांडपाणी व्यवस्थापनासाठी पहिल्या टप्प्यात 90 कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली असून अमृत योजनेंतर्गत मनपाने भुयारी गटार योजनेसाठी डीपीआर तयार करून शासनाला सादर केला आह़े त्यामुळे भुयारी गटार योजनेचा प्रश्न सुटणार आह़े तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शहरात 136 कोटी रूपयांची पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत असून या योजनेचे काम सध्या प्रगतिपथावर आह़े तसेच अमृत योजनेंतर्गत अक्कलपाडा प्रकल्प ते हनुमान टेकडी जलशुध्दीकरण केंद्रार्पयत जलवाहिनी व अनुषंगिक कामांचा प्रस्तावही मनपाने शासनाला यापूर्वीच सादर केला आह़े घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मात्र अनेक वर्षापासून रखडला असून चार वेळा निविदा काढूनही प्रत्येकवेळी अडथळे आल्याने कचरा संकलन व प्रक्रियेचा प्रश्न अद्याप सुटू शकलेला नाही़ मात्र मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर हा प्रश्न सोडविण्यासाठी मनपात हालचाली सुरू असून इकोप्रो एनव्हायरमेंटल सिस्टीम (पुणे) या कंपनीकडून घनकचरा व्यवस्थापनाचा तब्बल 35 कोटी रूपये खर्चाचा डीपीआर तयार करून घेण्यात आला असून त्यात आवश्यक ते बदल करून अखेर 27 कोटी 98 लाख 66 हजार रूपयांचा घनकचरा व्यवस्थापनाचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास तांत्रिक मंजूरीसाठी मनपाने सादर केला आह़े