धुळे, दि. 29 - सुप्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉ माधुरी बोरसे यांनी मंगळवारी (२९ ऑगस्ट) मुंबई येथे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील-दानवे, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भाभरे, राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत बोरसे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. डॉ. माधुरी बोरसे या मितभाषी असल्यामुळे धुळे शहरातील शिवसेनेच्या सर्व गटांशी त्यांचा चांगला समन्वय होता. शिव आरोग्य सेनेच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी संपूर्ण राज्यात हजारो डॉक्टरांचे चांगले संघटन उभारले होते. धुळे शहरात गेल्या १५ वर्षांपासून त्या एक निष्णात कॅन्सर सर्जन म्हणून परिचित आहेत. अनेक क्लिष्ट शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. वैद्यकीय व्यवसाय करत असताना त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली. ८० फूट रोड स्थित त्यांच्या निरामय हॉस्पिटल व श्वास क्रिटीकेअर सेंटरने सतत ५ वर्षांपासून जीवनदायी योजनेत संपूर्ण महाराष्ट्रात उत्कृष्ट कामगिरी करून अव्वल स्थान कायम ठेवले आहे. डॉ माधुरी बोरसे या राज्याच्या माजी आरोग्यमंत्री डॉ शालिनीताई बोरसे व डॉ सुधाकर बोरसे यांच्या कन्या आहेत. अभय युवा कल्याण केंद्र संचालित अनेक शिक्षण संस्थेच्या त्या संचालिका आहेत.
''गेल्या वर्ष भरापासून चर्चा सुरु होती, आज योग जुळून'' शिवसेना व शिवसेना पक्षप्रमुखांनी नेहमी मान दिला. सर्वसामान्य शिवसैनिकांनीदेखील सन्मान केला. सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी धाकटी बहीण समजून नेहमी मार्गदर्शन केले. कायम सर्वांच्या ऋणात राहीन - डॉ माधुरी बोरसे