लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : येथील कचेरी चौक परिसरातील आनंद पान सेंटरचे मालक धनराज भगवान बडगुजर (डांगे) यांचा मुलगा दर्शनने वैद्यकीय सामायिक परीक्षेत (नीट) ७२० पैकी ५२९ गुण मिळवत प्राविण्य मिळवले आहे. दर्शनने सीईटी परीक्षेतही ९९.९६ पर्सेंटाइल घेत गुणवत्ता सिद्ध केली आहे. धनराज बडगुजर हे सर्वसामान्य पानटपरी चालक असून आपला चरितार्थ जेमतेम चालवतात. त्यांचा भाऊ प्राध्यापक संजय बडगुजर याने दर्शनला मार्गदर्शन केले. शिंदखेडा येथील श्रीजी अभ्यासिकेचे अध्यक्ष सुनील चौधरी, माजी सभापती प्रा.सुरेश देसले यांनी दर्शनचा व त्यांचे वडील धनराज बडगुजर यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.दीपक माळी यांनी केले. यावेळी अभ्यासिकेचे संचालक अशोक गिरनार, योगेश चौधरी, जितेंद्र मेखे, प्रा.संजय बडगुजर तसेच अभ्यासक उपस्थित होते. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊन आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्याचा मनोदय दर्शन याने व्यक्त केला.