धुळे - मिशन ऑक्सिजन स्वावलंबन योजने अंतर्गत प्रति दिवस ५० टन ऑक्सिजनची निर्मिती होईल एवढ्या क्षमतेचा प्रकल्प अवधान येथील एमआयडीसीत उभारला जाणार आहे. ३० जूनपर्यंत शासनाकडे या योजनेसाठी प्रस्ताव सादर करणे बंधनकारक आहे. मात्र जागा उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातील उद्योजकांनी यासाठी अद्याप प्रस्ताव सादर केलेला नव्हता. सोमवारी उद्योग विभागाचे विभागीय सहसंचालक शैलेश राजपूत यांच्याशी उद्योजकांचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद झाला. यावेळी राजपूत यांनी जागा उपलब्ध करून देण्याबाबत सांगितले आहे. त्यामुळे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या कामाला गती येणार असून या प्रकल्पामुळे जिल्हा ऑक्सिजनच्याबाबतीत स्वयंपूर्ण होणार आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ठिकठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा भासला होता. दुसऱ्या लाटेतील रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र तिसरी लाट येण्याचे सूतोवाच वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचे आवाहन जिल्ह्यातील उद्योजकांना केले होते. प्रशासनाच्या आवाहनाला उद्योजकांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रति दिवस ५० टन क्षमतेचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र या प्रकल्पासाठी एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध होत नव्हती. मात्र उद्योग विभागाच्या सहसंचालकांनी जागा उपलब्ध करण्याबाबत असल्यामुळे लवकरच प्रकल्पाला सुरुवात होईल, अशी माहिती उद्योजक नितीन बंग यांनी दिली.
मिशन ऑक्सिजन स्वावलंबन योजना -
सध्या राज्यात प्रतिदिन १३०० मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होते. तर मागणी १८०० मेट्रिक टन इतकी आहे. तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी २३०० मेट्रिक टनपर्यंत जाऊ शकते. सध्या पुणे, रायगड अशा विशिष्ट भागात ऑक्सिजनची निर्मिती होते. त्याठिकाणाहून इतर ठिकाणी ऑक्सिजनची वाहतूक करणे अडचणीचे ठरते. त्यामुळे धुळे, नंदुरबार व विदर्भातील जिल्हे ऑक्सिजनच्याबाबतीत स्वयंपूर्ण व्हावीत यासाठी मिशन स्वावलंबन योजना शासनाने सुरू केली आहे. या योजने अंतर्गत प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या उद्योजकांना १५० टक्के अनुदान मिळणार आहे. ३० जूनपर्यंत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासाठी प्रस्ताव सादर करणे व ३१ डिसेंबर २०२० पर्यंत उत्पादन करणे बंधनकारक असणार आहे.
जिल्हा रुग्णालयातील प्रकल्पाचे लवकरच लोकार्पण -
जिल्हा रुग्णालयात संजय सोया कंपनीच्या माध्यमातून ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून दररोज ६० जम्बो सिलिंडर इतक्या ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून येत्या दोन दिवसात त्याचे लोकार्पण होणार आहे. तसेच उद्योग विभागाकडून प्रतिदिन २०० सिलिंडर ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प याठिकाणी उभारला जात आहे. त्याचे काम दोन आठवड्यात पूर्ण होणार आहे.
हिरे महाविद्यालयात २० हजार लीटर क्षमतेचा ऑक्सिजन टँक -
हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १३ हजार लीटर क्षमतेचा ऑक्सिजन टँक उभारण्यात आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढल्याने ऑक्सिजनच्या बाबतीत या टँकवरच सर्व भिस्त होती. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात आणखी २० हजार लीटर क्षमतेचा ऑक्सिजन टँक उभारला जाणार आहे.