ऑनलाईन लोकमत
धुळे ,दि.27 -जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण थांबलेली नाही़ सद्यस्थितीत 16 गावांना 14 टँकरने पाणी पुरविले जात आह़े पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली असलीतरी अद्यापही जिल्ह्यात सर्वदूर पावसाची आवश्यकता आह़े पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून प्रयत्न सुरु आहेत़
16 गावांसाठी टॅँकर सुरू
जिल्ह्यात शिरपूर वगळता धुळे, साक्री व शिंदखेडा या तीन तालुक्यांमधील 16 गावांसाठी सध्या 14 टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
जिल्ह्यात धुळे तालुक्यात नवलाणे, आणि बेहेड, नावरा, धमाणे, चिंचवार, आंबोडे, वडगाव व धाडरा या 8 गावांसाठी खासगी विहीर व नावरी, धमाणे या 2 गावांसाठी विंधन विहीर (बोअर) अधिग्रहित करण्यात आली आहे. साक्री तालुक्यात 27 गावांसाठी खासगी विहीर तर 5 गावांसाठी विंधन विहीर अधिग्रहित करण्यात आली आहे. शिंदखेडा तालुक्यात 47 गावांसाठी खासगी विहीर तर 15 गावांसाठी खासगी विंधन विहीर अधिग्रहीत करण्यात आली आहे. शिरपूर तालुक्यात 2 गावांना खासगी विहीर तर पारशीपाड व अंबडपाडा (वरझडी) येथे खाजगी विंधन विहीर अधिग्रहित करण्यात आली आहे.
तात्पुरत्या योजनांचा दिलासा
जिल्ह्यात 19 गावांना तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 17 पूर्ण झाल्या असून दोन प्रगतीपथावर आहेत. साक्री तालुक्यातील 7 गावांना व शिंदखेडा तालुक्यातील 4 अशा एकूण 19 गावांचा समावेश आहे. 19 योजनांपैकी साक्री तालुक्यातील शिरसोले व फोफरे वगळता सर्व योजना पूर्ण होऊन त्याद्वारे गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.