भूषण चिंचोरे, धुळे : भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीयमहाविद्यालय व रुग्णालयाच्या आवारात ठिकठिकाणी कचरा साचला आहे. जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी अनेकदा पाहणी करून अस्वच्छतेचा आढावा घेतला आहे; पण तरीही घाणीचे साम्राज्य कायम आहे. त्यामुळे उपचारासाठी हजारो रुग्ण येणाऱ्या या रुग्णालयाला स्वच्छतेचे इंजेक्शन कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सोमवारी सकाळी ११ वाजता ‘लोकमत’ने हिरे महाविद्यालयाची पाहणी केली असता इमारत क्रमांक दोनच्या प्रवेशद्वाराजवळ असलेली कचराकुंडी ओसंडून वाहत होती. याच इमारतीत खाली पार्किंगकडे जाणारा रस्ता कचरा, पाण्याच्या बाटल्या व काटेरी झाडांनी भरून गेला आहे. तसेच इमारतीच्या खालील भागात पाणी साचल्याने दुर्गंधी पसरली आहे.
एमआयडीसीतून सोडले जाते दूषित पाणी
हिरे वैद्यकीय महाविद्यालयासमोरून वाहणाऱ्या नाल्यात एमआयडीसीतून दूषित पाणी सोडले जाते. त्यामुळे परिसरात उग्र वास व दुर्गंधी वाढली आहे. तसेच नाल्यानजीक असलेल्या विहिरीत हे पाणी पाझरण्याची शक्यता आहे. एमआयडीसीतून सोडले जाणारे दूषित पाणी थांबवण्याची मागणी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी केली आहे.
तळमजल्यावरील पाण्यामुळे दुर्गंधी
पाइपलाइनला गळती लागल्यामुळे रुग्णालयाच्या इमारत क्रमांक दोनच्या तळमजल्यावर पाणी साचले आहे. त्यात कचरा टाकल्याने दुर्गंधी पसरली आहे. पाइपलाइन दुरुस्त करण्याची मागणी महापालिकेकडे केली असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
खाटा वाढल्या, स्वच्छता कर्मचाऱ्यांची पदे रिक्त
जिल्हा रुग्णालयातून हिरे वैद्यकीय महाविद्यालय, चक्करबर्डी परिसरात स्थलांतरित झाले त्यावेळी रुग्णालयाची क्षमता २५० खाटांची होती, तर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची २२५ पदे मंजूर होती. आता रुग्णालयातील खाटांची क्षमता ६२० पर्यंत वाढली आहे. मात्र केवळ ११० स्वच्छता कर्मचारी कार्यरत आहेत.रुग्णालयातील कचरा एका ठिकाणी गोळा केला आहे. कचरा उचलण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची मदत घेतली जाणार असून, त्यांंच्याशी पत्रव्यवहार केला आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे भरण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. - डॉ. अरुण मोरे, अधिष्ठाता, हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"