धुळे : पावसाचे सावट असल्याने मतदारांनी सकाळी लवकर घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावला. एकाचवेळी महिला, पुरूष मतदानासाठी घराबाहेर पडल्याने, मतदान केंद्रावर लांबलचक रांगा लागल्या होत्या. मात्र फागणे, वडजाई येथे ईव्हीएम मशीन बंद पडल्याने खोळंबा झाला होता. असे असले तरी सर्व ठिकाणी उत्साह दिसून आला.विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान झाले. त्यानिमित्त धुळे ग्रामीण मतदार संघातील बाळापूर, फागणे, वडजाई येथील मतदान केंद्रांना ‘लोकमत’ प्रतिनिधीने भेट दिली असता, वरिल स्थिती दिसून आली.फागणेत ईव्हीएम बंदफागणे गावात तर सकाळपासूनच मतदान केंद्राबाहेर मतदारांची रांग लागली होती. गावात मतदानासंदर्भात उत्साह दिसून आला. सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास शेठ रामनारायण रूईया प्राथमिक शाळेतील मतदान केंद्राला भेट दिली असता. त्याठिकाणी महिला मतदारांची मोठी रांग लागलेली होती. या शाळेत तीन मतदान केंद्र होती.दरम्यान मतदान केंद्र क्रमांक १०० मध्ये सकाळी ११.१५ ते दुपारी १२.०५ या कालावधीत ईव्हीएम मशीन बंद पडले होते. त्यामुळे जवळपास ५० मिनीटे मतदारांना रांगेत ताटकळत उभे रहावे लागले. एका वृद्धेने चुकीचे बटन दाबल्यामुळे मशीन बंद पडले होते. ते तत्काळ बदलण्यात आले. मशीन बंद पडल्याने, केंद्राबाहेर मतदारांच्या लांबलचक रांगा लागलेल्या होत्या. खोळंबा झाला तरी मतदारांचा उत्साह कमी झालेला नव्हता. याठिकाणी सीआयएसएफ जवानांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता.वडजाईला दोन मशीन बदलवलेतालुक्यातील वडजाई येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान केंद्र होते. याठिकाणी मतदान केंद्र क्रमांक १२४ मध्ये सकाळी मॉकड्रील झाल्यानंतर लागलीच मतदान यंत्र बंद पडले. त्यानंतर काही मतदारांनी मतदान केल्यानंतर पुन्हा मशीन बंद पडले. त्यानंतर तिसरे मशीन लावण्यात आले. यात बराच वेळ गेल्याने, मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. याठिकाणी दुपारी १ वाजेपर्यंत ३३.९९ टक्के मतदारांनी मतदान केले. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुमारे ६० टक्के मतदान झाले. तेथे ३ हजार ३३ पैकी २ हजार ३३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.कासारे : ४५.८१ टक्के मतदानकासारे - येथील केंद्रांवर ४५.८१ टक्के मतदान झाले. गावात ७ मतदान केंद्रे होती. येथे एकूण ८ हजार ४९ मतदार होते. त्यापैकी ३ हजार ६८८ मतदारांनी मतदान केले. एकूण मतदारांत ४ हजार ८९ पुरूष तर ३ हजार ९६० महिला मतदार होते. त्यापैकी १ हजार ९७९ पुरुष तर १ हजार ७०९ महिला मतदारांनी हक्क बजावला.लामकानी :६७.१५ टक्के मतदानलामकानी - येथे एकूण ६ मतदान केंद्रांवर ४ हजार ९९६ पैकी ३ हजार ३५५ मतदारांनी हक्क बजावला. त्यात १ हजार ५८२ महिला तर १ हजार ७७३ पुरूष मतदार होते. मतदानाची टक्केवारी ६७.१५ टक्के एवढी आहे.मालपूर : ६५ टक्के मतदानमालपूर - येथे ७ हजार ९१२ पैकी ५ हजार ७८ मतदारांनी मतदान केले. त्यात २ हजार ६२३ पुरूष मतदार तर २ हजार ४५५ महिला मतदारांचा समावेश आहे. मतदानाची टक्केवारी आहे.थाळनेरला ५६.१६ टक्के मतदानथाळनेर - शिरपूर मतदारसंघातील थाळनेर येथे ९ मतदान केंद्रांवर ४ हजार ९१६ मतदारांनी मतदान केले. त्याची टक्केवारी ५६.१६ टक्के एवढी आहे. मतदारांमध्ये उत्साह दिसला. दुपारचा अपवाद वगळता सकाळी व संध्याकाळी केंद्रांवर मोठ्या रांगा लागल्या होत्या. शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथे ३ हजार ४८४ पैकी २ हजार २१० मतदारांनी मतदान केले.
मतदानासाठी सकाळपासूनच रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 12:03 PM