आॅनलाइन लोकमतधुळे : यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे पाण्याची मुबलकता मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच जमिनीतही ओलावा चांगल्या प्रकारे आहे. त्यामुळे यावर्षी जिल्ह्याचे रब्बीचे पेरणीच्या क्षेत्रात २० ते २५ टक्यांनी वाढ होऊ शकेल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केलेला आहे. दरम्यान रब्बीचे नियोजन करण्याचे काम अंतिम टप्यात सुरू असल्याची माहिती देण्यात आली.जिल्ह्यात पावसाची टक्केवारी १०० टक्यांपेक्षा अधिक आहे. सर्वच नदी-नाले तुडूंब भरलेले असून विहिरींनाही मुबलक प्रमाणात पाणी आहे. जमीनीत ओलावा कायम आहे. त्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात साधारणत: ८२ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पिकांची लागवड होत असते. मात्र गेल्या वर्षी पाऊस नसल्याने, अवघ्या ५० हजार ६३१ हेक्टर क्षेत्रावरच रब्बीची पेरणी होऊ शकली होती.मात्र यावर्षी पाण्याची मुबलकता मोठ्या प्रमाणात असल्याने, सुमारे १ लाख १० ते १५ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पिकाची लागवड होऊ शकते. रब्बीच्या लागवडीत यावर्षी २० ते २५ टक्यांनी वाढ अपेक्षित असल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली आहे. गेल्यावर्षाच्या तुलनेत हे जास्त असेल.