लोकमत न्यूज नेटवर्क, धुळे : भारत जोडो यात्रेनिमित्ताने खासदार राहुल गांधी हे बुधवारी सकाळी धुळ्यामध्ये दाखल झाले. त्यांनी पहिली भेट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांची देवपूर धुळे येथील निवासस्थानी जाऊन घेतली. यावेळी त्यांनी कैसे है आप दाजीसाहब असे विचारत गळाभेट घेतली. त्यानंतर ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्याशी संपर्क करून त्यांचे रोहिदास पाटील यांच्याशी बोलणे करून दिले.
दोंडाईचा येथून सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास खासदार राहुल गांधी यांचे धुळ्यात आगमन झाले. यात्रेचे स्वागत झाल्यानंतर ते रोहिदास पाटील यांच्या घरी गेले. राेहिदास पाटील यांच्या पत्नी लता पाटील यांनी राहुल गांधी यांचे औक्षण केले. यावेळी राहुल गांधी यांनी राेहिदास पाटील यांच्या प्रकृतीची आणि वैद्यकीय उपचाराची माहिती जाणून घेतली. सुमारे १० मिनिटे राहुल गांधी याठिकाणी उपस्थित होते. यावेळी राेहिदास पाटील यांचे चिरंजीव आमदार कुणाल पाटील, त्यांच्या पत्नी अश्विनी पाटील आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि डॉ. दिलीप पाटील उपस्थित होते.