- अतुल जोशीधुळे - धुळे शहरासह परिसरात रविवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचल्याने, या भागाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते.अनेक भागात कंबरे एवढे पाणी साचल्याने, नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले होते.नागूपर-सुरत महामार्गावरील मोराणे गावाजवळील मोरीवरील पुलाचा भराव वाहून गेल्याने अवजड वाहतूक शहरातून वळविण्यात आली. खासदार डॅा. सुभाष भामरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी अनेक भागात जाऊन पहाणी केली. सुदैवाने कुठेच हानी झाल्याचे वृत्त नाही.
गेल्या काही दिवसांपासून धुळे शहर व परिसरात पाऊसाची सतत हजेरी लागत आहे. मात्र रविवारी रात्री ९ वाजेपासून मुसळधार पाऊस सुरू झाला. अवघ्या काही तासातच शहरातील सखल भाागत पाणी साचले. रात्रभर पाऊस सुरू असल्याने, शहरातील सर्व नाल्यांना पूर आला. सखल भागात कंबरएवढे पाणी साचले. काही भागांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे रहिवाशांना घरातून बाहेर पडणे कठीण झाले. काही भागात एनडीआरएफच्या जवानांची मदत घेण्यात आली. सुरत-नागपूर महामार्गावरील मोराणे गावानजीक असलेला मोरी पुलाचा भराव वाहून गेल्याने, महामार्गावरील अवजड वाहतूक शहरातून वळविण्यात आली आहे. दरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव मनपा हद्दितील शाळांना एक दिवसाची सुटी देऱ्यात आली आहे.
खासदार, जिल्हाधिकाऱ्यांकडून पहाणी शहरात झालेल्या अतिवृष्टीची खासदार डॅा. सुभाष भामरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पहाणी करून आढावा घेतला. बोरीला पूर, गावांचा संपर्क तुटला. दरम्यान अतिवृष्टीमुळे बोरी नदीला पूर आला असून, रतनपुरा, बोरकुंड या गावाचा संपर्क तुटलेला आहे.