धुळे : जिल्ह्यात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. शिरपूर वगळता उर्वरीत तिन्ही तालुक्यातील सात मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यात धुळे तालुक्यातील चार, शिंदखेडा तालुक्यातील दोन व साक्री तालुक्यातील एका मंडळाचा समावेश असून सर्वाधिक पाऊस तालुक्यातील सोनगीर व खेडे या दोन मंडळांमध्ये झाला असून तेथे प्रत्येकी १८० मि.मी. पावसाची नोंद झाली. सोनगीर येथे अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून दापुरा, ता.धुळे येथे बैलजोडी ठार झाली. सकाळी पावसाने काहीवेळ विश्रांती घेतली. पुन्हा पाऊस झाला.या पावसामुळे जिल्ह्यात अक्कलपाडा, वाडीशेवाडी व अमरावती या मध्यम प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. विविध प्रकल्पातून मंगळवारी संध्याकाळपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून अद्याप तो सुरूच आहे. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील तिसगाव ढंढाणे येथील भात नदीवरील जुना बंधारा फुटला. त्यामुळे मोठे नुकसान झाले असून जवळच्या घरांमध्येही पाणी शिरले. सोनगीर परिसराला सर्वाधिक तडाखा बसला असून पिकांचे अतोनात नुकसान झाले. सोनवद मध्यम प्रकल्पही फुल्ल झाला आहे.
जिल्ह्यात सात मंडळांत अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 2:06 PM