धुळे : येथे गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या राष्टÑीय बुद्धिबळ स्पर्धेत रामनाथन बालसुब्रमण्यम सर्वसाधारण विजेता ठरला. अखिल मराठी बुद्धिबळ संघटना महाराष्ट्र व धुळे चेस असोसिएशन यांच्या वतीने श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयात आठवडाभरापासून सुरू असलेल्या पहिल्या राष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धेच्या नऊ फेऱ्या झाल्या. त्यानंतर रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ झाला. यावेळी विजेत्यांना रोख बक्षिसे प्रदान करण्यात आली.या स्पर्धेमध्ये विविध वयोगटातील व आंतरराष्ट्रीय पातळीवर मानांकन प्राप्त खेळाडूंसह एकंदरीत जवळपास दोनशे खेळाडू सहभागी झाले होते. पस्तीस यशस्वी स्पर्धकांना अडिच लाख रुपयांची रोख बक्षिसे, ट्रॉफी व प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.याप्रसंगी महाविद्यालयाचे अध्यक्ष सुभाष देवरे, खजिनदार गुणवंत देवरे, चेस असोसिएशन राज्य खजिनदार राजेंद्र कोंडे, सहसचिव शोभराज खोंडे, धुळे असोसिएशन अध्यक्ष डॉ.गुंजन पाटील, सचिव शैलेंद्र खोंडे, मुख्य पंच स्वप्निल बनसोड, प्राचार्य डॉ .हितेंद्र पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. प्राचार्य डॉ.पाटील यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेच्या आयोजनाची संकल्पना मांडून स्पर्धेची इत्यंभूत माहिती दिली. यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करुन त्यांनाही शुभेच्छा दिल्या.राजेंद्र कोंडे यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजना बद्दल महाविद्यालयास धन्यवाद दिले व यापुढेही स्पर्धा आयोजन करण्यात याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्ष देवरे यांनीही यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या व यापुढेही स्पर्धा आयोजित करू असे आश्वासन दिले. प्रा विनय पाटील यांनी सूत्रसंचालन केले प्रा कुणाल पाटील यांनी बक्षिस प्राप्त खेळाडूंच्या यादीचे वाचन केले. संयोजक प्रा योगेश रवंदळे यांनी आभार मानले.या स्पर्धेमध्ये तामिळनाडू राज्यातील आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडू रामनाथन बालसुब्रहण्यम सर्वसाधारण विजेता ठरला. त्यास रुपये ३१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. अतुल डहाळे याने द्वितीय २० हजारांचे पारितोषिक मिळवले. एकूण एकसष्ट खेळाडूंनी बक्षिसे मिळवली. तसेच तीन अकॅडमी यांनाही पारितोषिक देण्यात आले.या स्पर्धेसाठी प्रा विनोद शिंदे, प्रा जितेंद्र व्यास, प्रा गौरव पाटील, प्रा मयूर अग्रवाल, प्रा विजय तवर, प्रा प्रविण ठाकरे यांनी संयोजन केले तसेच विद्यार्थ्यांतर्फे सौरभ पोतदार, कल्पेश डाखोडे, गणेश मुपा, करण जेठवा, नयन चौधरी, चेतन सोनवणे, प्रितेश पाटील, विशाल पाटील, जागृती ढिवरे, शिवानी मंदान, नेहा मोरे, हर्षदा पंचभाई यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
रामनाथन बालसुब्रमण्यम ठरला स्पर्धेचा सर्वसाधारण विजेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 10:27 PM