लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : दारु पिण्याच्या कारणावरुन सोनगीर शिवारात पांडूरंग ढिवरे यांचा खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पिंप्री शिवारात फेकून दिल्याची घटना २०१३ मध्ये घडली होती़ या गुन्ह्यात दोघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे़ मुंबई-आग्रा महामार्गावरील सोनगीर शिवारात उड्डाणपुलाच्या खाली २१ आॅगस्ट २०१३ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास दारु पिण्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणात पांडूरंग तुकाराम ढिवरे (४१, संत नरहरीनगर, धुळे) यांना हेमंत गोपीचंद पाटील आणि रफिक मोहम्मद पठाण या दोघांनी मारहाण करुन जिवे ठार मारल्याचा संशय होता़ त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह एमएच ०२ एपी २८१ या क्रमांकाच्या कारमध्ये हा मृतदेह टाकून तो वडजाई रोडलगत पिंप्री शिवारात शेताजवळ टाकून देण्यात आला होता़ याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ याप्रकरणातील पुरावे, १५ साक्षीदारांच्या साक्षी तपासून या प्रकरणाचा निकाल २६ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांच्या न्यायालयाने दिला़ त्यानुसार, संशयित आरोपी हेमंत गोपीचंद पाटील आणि रफिक मोहम्मद पठाण या दोघांना खून प्रकरणात दोषी ठरविण्यात आले़ यात भादंवि कलम ३०२ मध्ये दोघांना आजिवन कारावास व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने साध्या कैदेची शिक्षा, भादंवि कलम २०१ अन्वये तीन वर्षाची शिक्षा व १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास २ महिने साध्या कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे़ या खटल्याचे कामकाज अॅड़ पराग मधुकर पाटील यांनी सांभाळले़ या प्रकरणाचे तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी न्यायालयापुढे ग्राह्य पुरावा सादर केला़ पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार यांनी कामकाज पाहीले़ या निकालाकडे लक्ष लागून होते़
हेमंत पाटीलसह रफिक पठाणला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 5:24 PM