राजेंद्र शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, धुळे: जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात भारतीय जनता पक्षाने तीन मतदारसंघात उमेदवार जाहीर करुन प्रचारात आघाडी घेतली आहे. मात्र, धुळे ग्रामीण व साक्री मतदारसंघातील जागा वाटपाबाबतचा तिढा अजून सुटला नसल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात पाचही मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार असली तरी काही ठिकाणी बंडखाेरीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पक्षांसाठी ही डोकेदुखी ठरणार आहे. गेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघापैकी शिंदखेडा आणि शिरपूर भाजप, धुळे ग्रामीण काँग्रेस आणि धुळे शहर एमआयएम तर साक्रीतून अपक्ष आमदार निवडून आले आहेत.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
धुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाचा मुद्दा या निवडणुकीत कळीचा ठरु शकतो. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडले आहेत. यामुळे हा प्रश्नही निवडणुकीत गाजणार आहे. दिल्ली-मुंबई काॅरिडाॅर औद्योगिक प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. धुळे शहरातून जाणारा धुळे-सुरत-नागपूर महामार्गाचे कामही गेल्या काही वर्षांपासून धिम्या गतीने सुरु आहे. शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असलेली कमालीची नाराजी या विधानसभा निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरु शकते.
जिल्ह्यातील विधानसभांचे चित्र असे
मतदारसंघ - मतदान - विद्यमान आमदार - पक्ष - मिळालेली मते
- धुळे शहर ४९.४०% फारुक शाह एमआयएम ४६,६७९
- धुळे ग्रामीण ६४.३५% कुणाल पाटील काँग्रेस १,२५,५७५
- साक्री ५९.७७% मंजुळा गावित अपक्ष ७६,१६६
- शिरपूर ६५% काशिराम पावरा भाजप १,२०,४०३
- शिंदखेडा ६०.९९% जयकुमार रावल भाजप १,१३,८०९
६०.३% - मतदान २०१९ मध्ये विधानसभेसाठी होते
३८ - उमेदवारांनी गेल्या निवडणुकीत जिल्ह्यात नशिब आजमावले
१२ - उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते