लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शिंदखेडा तालुक्यातील विखरण (देवाचे) येथील औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीच्या वाढीव मोबदल्या प्रकरणी शेतकरी धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी गुरूवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन निवासी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांना वाढीव मोबदल्याबाबत निवेदन दिले. आपणास न्याय मिळालेला नसून आपण तत्कालीन अधिकाºयांसह विद्यमान राज्य सरकारविरूद्धही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यांनी सोबत वडील धर्मा पाटील यांचा अस्थिकलशही आणला असून आई सखुबाई याही त्यांच्यासोबत आहेत. महिलादिनी न्याय मागण्यासाठी आपण आल्याचे सखुबाई यांनी निवेदनात नमूद केले आहे. जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यासाठी पाटील गुरूवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. परंतु डॉ.पांढरपट्टे महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी बाहेर गेले असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे पाटील यांनी निवासी उपजिल्हाधिकारी अंतुर्लीकर यांना निवेदन सोपविले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुढील लढ्याबद्दल माहिती दिली. विद्यमान सरकारनेही आपणास न्याय दिलेला नाही. जो दिला तो लाजीरवाणा न्याय आहे. त्यामुळे तत्कालीन दोषी अधिकाºयांसह सरकारविरूद्ध वडिलांच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा तसेच न्याय मिळेपर्यत लढा देण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखविला. दरम्यान जिल्हाधिकारी डॉ.पांढरपट्टे यांची भेट घेण्यासाठी ते अद्याप कार्यालयात थांबून आहेत.