आॅनलाइन लोकमतधुळे : गावागावात स्वच्छतेची चळवळ गतिमान होत असतांना प्लॅस्टिक कचरामुक्ती करणेदेखील गरजेचे आहे. महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनमित्ताने २ आॅक्टोबर १९ पर्यंत आपण सर्व लोकसहभागातून प्लास्टिक कचरा हद्दपार करूया असा निर्धार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांनी केला.जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात स्वच्छता ही सेवा अभियानाचा शुभारंभ वान्मथी सी. यांच्याहस्ते झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे होते.वान्मथी सी.पुढे म्हणाल्या, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आतापर्यंत वैय्यक्तीक शौचालयांची कामे झाली आहेत. आता शाश्वत स्वच्छतेकडे वाटचाल सुरू झालेली आहे. प्लॅस्टिक कचऱ्याची समस्या सर्वत्र भेडसावत आहे. ही समस्या सुटण्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता आहे. सर्वप्रथम आपण आपल्या घरापासून याची सुरूवात करावी. बाजारात जातांना कापडी पिशवीचा वापर केला पाहिजे असे त्यांनी सांगितले. संदीप माळोदे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वाघ यांनी केले.सूत्रसंचालन विजय हेलिंगराव यांनी केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे. तडवी, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागूल, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण देवरे, बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्या वर्षा घुगरी, समाज कल्याण विभागाचे भारत धिवरे, उपस्थित होते.
लोकसहभागातून प्लॅस्टिक कचरा हद्दपार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 8:35 PM