मालपूर : येथील अमरावती मध्यम प्रकल्पाच्या वक्राकार दरवाजासह, वीज उपकरणांची, बांधावरील काटेरी झुडपे काढण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. या संदर्भात ‘लेकमत’मधून वृत्त प्रसिद्ध झाले होते, त्याची दखल घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. प्रकल्पाच्या यंत्रांचे आॅईल, ग्रीसींग व वायरींगचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.मालपूर येथील अमरावती हा गेल्या चौदा वर्षापासून पूर्णक्षमतेने भरु शकला नाही. मे-जून महिन्यात तर मृत जलसाठ्यात एकथेंब पाणी नव्हते. मात्र आता चांगला साठा झाला आहे.जलसाठा वाया जाऊ नये, वक्राकार दरवाज्यांना असलेली गळती दुरुस्त करावी, तेथील विद्युत पुरवठा अद्ययावत करुन वीज दिव्यांची सुरळीत सोय करावी, काटेरी झुडपांमुळे मातीच्या बंधाऱ्याला धोका होऊ नये अशी मालपूरकरांची रास्त अपेक्षा होती व त्यासंदर्भात ‘लोकमत’मधून ४ आॅगस्ट रोजी वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत अमरावती मध्यम प्रकल्पाचे प्रभारी कनिष्ठ अभियंता प्रशांत खैरनार यांनी काम सुरू झाल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. प्रकल्पाच्या वक्राकार दरवाजांसह वीज उपकरणांची देखभाल व काटेरी झुडपे काढणे गरजेचे आहे. गतवर्षी कधी नव्हे एवढी पाणीटंचाई मालपूरकरांनी अनुभवली असून आता पाण्याचा प्रत्येक थेंब वाया जाणार नाही, यासाठी सज्ज आहेत. अमरावती मध्यम प्रकल्प प्रशासनाने सर्व प्रकारच्या गळत्या बंद करुन ग्रामस्थांच्या परवानगी शिवाय कोणत्याही पाणी उपसा करणारा वीजपंप प्रकल्पावर ठेवू देऊ नये. अन्यथा त्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही दिला आहे.
अमरावती प्रकल्पाच्या यंत्रसामग्रीची दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 9:55 PM