लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अक्कलपाडा प्रकल्पातून सोमवारी दुपारी सोडलेले पाणी मंगळवारी सकाळी तालुक्यातील नेर गावाजवळील चंदन टेकडी बंधा-यापर्यंत पोहचले. हा बंधा-या भरून ओसंडल्यानंतर आवर्तनाचा धुळे शहराकडे प्रवास सुरू झाला आहे. हे आवर्तन शिंदखेडा तालुक्यातील मुडावद गावापर्यंत पोहचविण्याचे पाटबंधारे विभागाचे प्रयत्न आहेत. प्र.जिल्हाधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे यांनी शनिवारीच पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिले होते. पांझरा नदीपात्रालगत धुळे, शिंदखेडा व अमळनेर असे तीन तालुके असून त्या तिन्ही तालुक्यातील सुमारे शंभरावर गावांना या आवर्तनाचा लाभ मिळणार आहे. ८५ गावांच्या पाणी योजना या नदीकाठी असून पाणी आटल्याने तीव्र पाणीटंचाईचा फटका या गावांना बसत आहे. जनावरांचेही पाण्याविना हाल होत असून आवर्तनामुळे त्यांचीही सोय होईल, असे सांगण्यात आले. मंगळवारी सकाळी नेरजवळ पोहचलेले आवर्तन बुधवारी किंवा गुरूवारी सकाळी शहरातील नदीपात्रात पोहचेल, असा पाटबंधारे विभागाचा अंदाज आहे. पहिल्या चार दिवसांत सोडलेल्या आवर्तनाचे पाणी कुठपर्यंत पोहचते, याचा अंदाज घेऊन त्यानंतर सोडण्यात येणाºया पाण्याचा वेग वाढविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. या आवर्तनामुळे ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. पहिले आवर्तन फेबु्रवारी महिन्यात सोडण्यात आले होते. त्यास अडीच महिना उलटल्याने अक्कलपाडा प्रकल्पातून आरक्षित पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी सातत्याने केली जात होती.