धुळे : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे गुरूवारी दिला. पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतरच राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान पुढील अध्यक्षाची निवड होईपर्यंत उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपदाचा भार असणार आहे.
पक्षांतर्गत अध्यक्षपदाचा कालावधी १३-१३ महिन्यांचा ठरलेला असल्याने, अश्विनी पाटील यांची मुदत १३ नोव्हेंबर २३ रोजी संपुष्टात आलेली होती. मुदत संपल्यानंतरही त्यांनी राजीनामा न दिल्याने, सत्ताधाऱ्यांमधील एक गट पाटील यांच्या राजीनाम्यासाठी सक्रीय झालेला होता. अखेर पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर १४ महिन्यानंतर गुरूवारी अश्विनी पाटील यांनी आपण आपल्या पदाचा राजीनामा स्वखुशीने देत असल्याचे माध्यमांना सांगितले. त्यामुळे गेल्या एक-दीड महिन्यांपासून अध्यक्षपदाच्या राजीनाम्याबाबत सुरू असलेल्या चर्चेवर आता पडदा पडला आहे.
कुणाबद्दलही नाराजी नाहीअश्विनी पाटील यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी जिल्हा परिषदेतील काही सदस्य आग्रही होती. त्यांनी पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेटी घेऊन हा मुद्दा उपस्थित केला होता. असे असले तरी आपल्याला कुणाबद्दलही राग नाही, नाराजी नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
यांची नावे चर्चेतजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी लवकरच अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. या पदावर धुळे तालुक्यातील लामकानी गटाच्या धरती निखील देवरे, शिंदखेडा तालुक्यातील विखरण गटाच्या कुसुमबाई कामराज निकम यांची नावे चर्चेत आहे.