धुळे : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपल्यावर साेपविण्यात आलेली जबाबदारी पार पाडावी. यात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी सूचना महापालिका प्रशासक तथा आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी बैठकीत दिली. दरम्यान, महापालिकेतील कोणत्याही अधिकारी वा कर्मचाऱ्यांनी दीर्घ रजेवर जाऊ नये. असे निर्बंध बैठकीतून लावण्यात आले. यावेळी अधिकारी उपस्थित होते.
लाेकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शनिवारी सायंकाळपासून आचारसंहिता लागू झालेली आहे. लोकसभा निवडणुकीत महापालिकेची भूमिका नेमकी काय असेल, यासंदर्भात आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी त्यांच्या दालनात रविवारी सुटीचा दिवस असूनसुद्धा तातडीची बैठक बोलाविली होती. त्या वेळी त्या बोलत होत्या. लाेकसभा निवडणूक २०२४ आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी करण्याकामी सोपविण्यात आलेली जबाबदारी यासंदर्भात आयुक्तांनी बैठकीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. बैठकीत आयुक्तांनी अधिकारी अणि त्यांच्याकडे निवडणूक संदर्भात कोणती जबाबदारी सोपविली आहे, याबाबत अवगत करून देण्यात आले.
त्यात प्रामुख्याने कुठल्याही कामाचे नवीन कार्यादेश देऊ नये. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जे कार्यादेश निर्गमित केले आहे व त्यापैकी जे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे तीच कामे पुढे चालू ठेवता येतील. कार्यादेश दिला तथापि प्रत्यक्षात काम सुरू झाले नसल्यास ते काम सुरू करू नये. मतदान केंद्रावरील रॅम्प, फर्निचर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, लाईट व्यवस्था, शाळा डागडुजी, साफसफाई आदीबाबत कार्यवाही करणे. १९ मार्चपर्यंत मतदान केंद्र सुस्थितीत निर्माण करणे. लवकरात लवकर राजकीय बॅनर, फलक, कोनशिला, कुंपण भिंतीवरील फलक झाकण्यात यावे तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागात सादर करावा.
आदर्श आचारसंहितेची काटेकाेरपणे अंमलबजावणी करावी. शिक्षण संस्थाचा शालेय कामकाजासाठीच वापर होईल याकडे लक्ष द्यावे. महापालिकेची वेबसाइट, सोशल मीडियावरील राजकीय व्यक्तीचे फोटो जाहिरात ताबडतोब काढण्यात यावी. महापालिकेतील १०९ क्रमांकाच्या दालनात आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला असून, तेथे अधिकारी व काही कर्मचारी नियुक्त करण्यात आले. शिवाय टोल फ्री क्रमांकाची व्यवस्था करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कालावधीत कोणत्याही कर्मचाऱ्यास दीर्घ रजेवर सोडू नये. तसेच विभागप्रमुखांनीही दीर्घ रजेवर जाऊ नये. रजेवर जाणे खूपच आवश्यक असल्यास परवानगी घेणे महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांना आता बंधनकारक करण्यात आले.