जैताणे ता़ साक्री : रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दर्शन सूर्यवंशीच्या गंधमुक्तीच्या दिवशी दहावीचा निकाल आला आणि हा निकाल त्याचे आईवडील, कुटूंबियांसह गावकऱ्यांना चटका लावून गेला़ दर्शनला दहावीत शेकडा ८२ टक्के गूण मिळाले़ त्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे़जैताणे येथील संजय न्हानू सुर्यवंशी यांचा सुपुत्र दर्शन सुर्यवंशी हा आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता दहावीत सेमी इंग्लिश वर्गात शिकत होता. त्याने मार्च २०२० मध्ये झालेल्या बोर्डाच्या परीक्षेसाठी खूप मेहनत घेऊन अभ्यास केला होता. कोरोनामुळे निकाल लांबले. निकालाची त्याच्यासह संपूर्ण परिवाराला उत्सुकता लागली होती. मात्र दुर्दैवाने निकालाच्या आधीच नियतीने त्याला हिरावून नेले.गेल्या २५ जूनला ही दुर्दैवी घटना घडली होती़ मागील हंगामात पिकवलेला कांदा शेतात पडून होता़ वडील संजय सुर्यवंशी दुपारी जेवायला घरी आले होते़ दरम्यान पावसाचे ढग गडद झाले. वडिलांनी शेतातल्या उघड्या कांद्याची चिंता व्यक्त केली. दर्शनने लगेच दुचाकीवरुन शेताकडे धाव घेतली.रस्त्याची झालेली दुरावस्था आणि मुसळधार पावसाने घात केला. समोरून येणाºया वाहनाने दर्शनच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात दोन्ही वाहनवरील स्वार गंभीर जखमी झाले. धुळ्याला जखमी अवस्थेत दाखल झालेल्या दर्शन ने रात्री ९ वाजता अखेरचा श्वास घेतला. पित्यासह संपूर्ण परिवार दु:खाच्या सागरात बुडाला.दर्शनच्या अपघाती मृत्यूच्या पाचव्या दिवशी गंधमुक्तीचा कार्यक्रम होता़ कार्यक्रमानंतर दोन तासांनी दुपारी एक वाजता त्याच्या मित्रांनी त्याचा निकाल बघितला़ दर्शन ८२ टक्के गूणांनी उत्तीर्ण झाला होता़ निकाल ऐकताच संपूर्ण परिसरावर दु:ख व हळहळ व्यक्त करण्याची दुर्दैवी वेळ आली.कै. दर्शन हा अतिशय हुशार व सर्वांचा लाडका होता. वडिलांच्या कष्टमय जीवनाला बदलण्याची त्याची अपेक्षा क्रूर नियतीने अपूर्णच ठेवली.
दर्शनच्या निकालाने जैताणे गावात हळहळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 9:52 PM