लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : लॉकडाउनमुळे जिल्ह्यात अडकलेले स्थलांतरीत मजुर, प्रवासी नागरिक, विद्यार्थी आणि पर्यटकांना घरी जाण्याची ओढ लागली आहे़ जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत राज्यातील आणि राज्याबाहेरील ८२६ प्रवासी पासेस दिल्या आहेत़ एका पासेसच्या मागे तीन ते सहा नागरिकांचा समावेश आहे़ त्यामुळे हा आकडा काही हजारांच्या आसपास आहे़गेल्या चाळीस दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासुन निवारा गृहांमध्ये राहणाºया या स्थलांतरीत नागरीकांना घरी जाण्याची घाई झाली असल्याने महसूल प्रशासनावर कामाचा ताण वाढला आहे़ असे असले तरी या प्रवाशांच्या भावना लक्षात घेवून त्यांना त्वरीत घर गाठता यावे यासाठी महसूल अधिकारी कार्यालयीन वेळेचा विचार न करता अहोरात्र कामाला लागले आहेत़प्रवासी पास मिळविण्यासाठी प्रशासनाने आॅनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे़ त्यानुसार आॅनलाईन अर्ज दाखल होत आहेत़ त्रुटी नसतील तर अर्जांना मंजुरी देवून पासेस दिल्या जात आहेत़ काही नागरीक अडचणींसाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात येत असल्याने त्यांनाही योग्य ते मार्गदर्शन करुन त्यांच्या अर्जातील त्रुटी दूर केल्या जात आहेत़ यासाठी प्रशासकीय इमारतीमधील जिल्हा विज्ञान अधिकारी विभागात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे़ जिल्हा विज्ञान अधिकारी कार्यालयातील कर्मचारी संगणकीय मदत देत आहेत़ गौणखनिज विभागातील भूषण पाटील यांच्यासह मुरलीधर नानकर, किरण चौधरी, विलास पाटील, जितेंद्र कापडणीस, विनोद पाटील आदी शिक्षक सध्या प्रशासनाला सहकार्य करीत आहेत़या संपूर्ण कामकाजावर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांचे नियंत्रण आहे़ इतर राज्यातील नागरीकांना प्रवासी पास देण्यासाठी जिल्हा पूनर्वसन अधिकारी प्रज्ञा बडे-मिसाळ यांच्यावर जबादारी आहे़ त्यांनी बुधवारी सायंकाळपर्यंत इतर राज्यातील स्थलांतरीत कामगारांना प्रवासी पासेस दिल्या आहेत़ त्यात उत्तर प्रदेशचे १७४ आणि बिहारच्या १२० मजुरांचा समावेश आहे़ २०९ मजुरांना भुसावळ येथून रेल्वेने पाठविण्याचे नियोजन केले़ परप्रांतीय मजुरांची प्रवासाची सोय करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत वरीष्ठ पातळीवर संपर्क करुन भुसावळ येथून रेल्वेची सोय केली़ शहर तहसिलदार संजय शिंदे, ग्रामीण तहसिलदार किशोर कदम आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळी खासगी वाहनांच्या माध्यमातून या मजुरांना भुसावळला रवाना केले़ या मजुरांना दोन वेळच्या जेवणाची पाकिटे, पाण्याच्या बाटल्या आणि बिस्कीटे देण्यात आली आहेत़ यासाठीचा खर्च प्रशासन तसेच दानशूर व्यक्तींकडून उपलब्ध करण्यात आला आहे़ शिवाय ज्या मजुरांकडे रेल्वे तिकीटाचे पैसे नव्हते त्यांचे पैसे महसूल अधिकारी आणि कर्मचाºयांनी पदरमोड करुन खर्च केले़ हे मजुर जाण्याच्या आधी महसूल विभागाच्या एका कर्मचाºयाला रेल्वेची तिकीटे काढण्यासाठी आधीच रवाना करण्यात आले होते़ यात राजस्थान, कर्नाटक, केरळ आणि मध्यप्रदेशातील मजुरांचा देखील समावेश आहे़मुंबई महानगर प्रदेश आणि कोकणची जबाबदारी असलेले निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांनी आतापर्यंत ७० प्रवासी पासेस दिल्या आहेत़ त्यांच्याकडे ११० अर्ज आॅनलाईन दाखल झाले आहेत़ त्रुटींअभावी ३९ अर्ज नामंजूर झाले आहेत़ मुंबईला जाणाºयांमध्ये काही मजुरांचा देखील समावेश होता़ त्यांच्याकडे प्रवासासाठी पैसे नसल्याने उपजिल्हाधिकारी भामरे यांनी त्यांना सहकार्य केले़विदर्भ आणि मराठवाड्याची जबाबदारी असलेले रोहयो उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांनी आॅनलाईन दाखल झालेल्या अर्जांपैकी बुधवारी सायंकाळपर्यंत ४० पेक्षा अधिक प्रवासी पासेस दिल्या होत्या़ लॉकडाउनच्या काळात ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने रोजगार हमी योजनेच्या कामांची महत्वाची जबाबदारी सांभळतानाच ते पासेस देण्याचे कामही करीत आहेत़पुणे आणि नाशिकची जबाबदारी असलेल्या उपजिल्हाधिकारी सुरेखा चव्हाण यांच्याकडे दाखल अर्जांवर कार्यवाही सुरू आहे़ संबंधित जिल्हाधिकाºयांच्या एनओसी वाट पाहिली जात आहे़विशेष म्हणजे महसूल विभागाने निवारा गृहांमध्ये राहणारे स्थलांतरीत कामगारांचे अर्ज स्वत: भरुन घेतले़ आॅनलाईन प्रणालीवर मंजुरी प्राप्त झाल्यानंतर संबंधित तालुक्यातील तहसिलदारांना मजुरांच्या प्रवासाची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या़ तहसिलदारांनी दानशूर व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मदत संकलीत करीत तसेच काही प्रशासकीय रक्कम खर्च करुन प्रवास आणि भोजनाची सोय करुन दिली आहे़ त्यात साक्रीचे तहसिलदार प्रवीण चव्हाणके, पिंपळनेर तहसिलदार विनायक थवील, शिरपूर तहसिलदार आबा महाजन आणि शिंदखेडा तहसिलदार साहेबराव सोनवणे आणि त्यांच्या कर्मचाºयांनी विशेष परिश्रम घेतले़आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य आणि पोलिस यंत्रणेला बळ देणाºया महसूल अधिकारी आणि कर्मचाºयांवर आता धुळे जिल्ह्यात अडकलेल्या नागरीकांना त्यांच्या घरी पोहोचविण्याची दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागत आहे़ त्यासाठी महसूल यंत्रणा रात्रंदिवस कामाला लागली आहे़कार्यालयात ‘नो एन्ट्री’प्रवासाची परवानगी घेण्यासाठी आणि त्यासंदर्भातील विविध समस्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या प्रवाशांची गर्दी होत आहे़ त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती लक्षात घेवून प्रशासकीय इमारतीमधील रस्ते देखील लाकडी टेबलद्वारे बंद करण्यात आले आहेत़ तसेच विविध विभागांच्या प्रवेशद्वाराला दोरी बांधून नो एन्ट्रीची सूचना लावली आहे़ अधिकारी आणि कर्मचारी दाराजवळ येवून बाहेर असलेल्या अभ्यागतांशी अंतर ठेवून चर्चा करीत आहेत़
महसूलतर्फे आतापर्यंत ८२६ जणांना पासेस वितरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2020 12:12 PM