साक्री : आदिवासींना वन जमिनींचे वाटप त्वरित करावे यासह अन्य विविध मागण्यासाठी गुरुवारी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे शहरातून मोर्चा काढण्यात आला. मोर्चा तहसील कार्यालयावर पोहचल्यावर संघटनेच्या विविध मागण्यासंदर्भात चर्चा सुरु असल्यामुळे रात्री उशीरापर्यंत आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू ठेवलेले होते.मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे किशोर ढमाले व सुभाष काकुस्ते यांनी केले मोर्चामध्ये असंख्य आदिवासी स्त्री व पुरुष सामील झाले होते़ आपल्या मागण्यांसाठी सायंकाळी उशिरापर्यंत तहसील कार्यालयात प्रांताधिकारी भीमराव दराडे तहसीलदार सुचिता भामरे यांच्याशी मोर्चाच्या शिष्टमंडळाशी चर्चा सुरू होती़ आदिवासींना वन जमिनींचे वाटप त्वरित करावे शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, दुष्काळ निधी त्वरित उपलब्ध करून द्यावा, अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या घरांची पडझड, पिकांचे नुकसान यांचे त्वरित पंचनामे करून भरपाई मिळावी,किसान सन्मान योजनेचे पैसे परिपत्रक तात्काळ रद्द करावे. याशिवाय पात्र वनदावे दारांना पूर्ण मालकीचा सातबारा उतारा द्यावा, वनखात्याने दाखल केलेले परिपत्रक तात्काळ रद्द करावे, अशा विविध मागण्यांचे चार पानांचे निवेदन प्रातांधिकारी भीमराव दराडे व तहसीलदार सुचिता भामरे यांना देण्यात आले.त्यानंतर यावर चर्चा करण्यासाठी तहसीलदार कार्यालयात सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे पदाधिकारी व अधिकाºयांमध्ये सायंकाळी चर्चा सुरु झाली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही. तोपर्यंत तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी आंदोलनकर्त्यांनी घेतला. रात्री उशीरापर्यंत ठिय्या आंदोलन सुरु होते. आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयाबाहेरच रात्रीचे जेवण तयार करण्यासाठी चूल मांडली होती.
आदिवासींचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 10:31 PM