धुळे : शिरपूर तालुक्यातील चांदपुरी ते टेंभे आणि चांदपुरी ते वनावल या दोन रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार वनावल गटाच्या जिल्हा परिषद सदस्या अभिलाषा भरत पाटील यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता नाशिक, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित गावाच्या ग्रामपंचायतींना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत होणाऱ्या या रस्त्यांवर सध्या खडीकरणाचे काम सुरू आहे. खडीकरण करताना नियमानुसार पाणी मारुन रोलरच्या साहाय्याने दबाई केली जात नसल्याने खडीकरण योग्य झालेले नाही. काम सुरू असतानाच खडी उखडू लागली आहे. अशा परिस्थितीत डांबरीकरण करण्याचा घाट ठेकेदारामार्फत घातला जात आहे. निकृष्ट दर्जाची खडी आणि कामाचा दर्जा चांगला नसल्याने डांबरीकरण झाल्यास या रस्त्याला खड्डे पडतील. याबाबत चांदपुरी आणि टेंभे येथील सरपंचांनी देखील मुख्य अभियंत्यांना तक्रार दिली आहे.