ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.8 - तालुक्यात बुधवारी संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे नाल्यांना आलेल्या पुरात वाहून गेलेल्या तात्पुरत्या रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून गुरुवारी संध्याकाळर्पयत ते पूर्ण होईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिली. यामुळे सध्या सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मेहेरगावमार्गेच सुरू आहे.
सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. इच्छापूर्ती गणपती मंदिराजवळ चौपदरीकरणांतर्गत पुलाचे काम सुरू असल्याने वाहतुकीसाठी नाल्यावर तात्पुरता उभारलेला रस्ता बुधवारी संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे आलेल्या पुरात वाहून गेला होता. रात्रीही पाऊस सुरूच असल्याने रस्ता दुरुस्तीचे काम शक्यच नव्हते. त्यामुळे गुरुवारी सकाळी हा तात्पुरता रस्ता पुन्हा तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले.
नाल्यात लांब सीमेंट पाईप ठेवून त्यावर रस्ता तयार करून त्याचे डांबरीकरण करण्याचे काम संध्याकाळी 4 वाजेर्पयत सुरूच होते. त्यानंतर अजून एक-दीड तासाने हा रस्ता वाहतुकीस खुला करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे सध्या मेहेरगाव या पर्यायी मार्गे महामार्गावरील वाहतूक संथगतीने सुरू होती.
मात्र अवजड वाहनांना जाण्यास ग्रामस्थांकडून मज्जाव करण्यात आला. त्यामुळे अवजड वाहने महामार्गावरच थांबून आहेत. मात्र अन्य वाहने पर्यायी रस्त्याने जात आहेत.