देवेंद्र पाठक, धुळे : लळींग घाटात चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना मालेगाव येथील त्यांच्या राहत्या घरातून जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. १८ जानेवारी रोजी सायंकाळी जबरी चोरीची घटना घडली होती. यात चेतन गणेश परदेशी (वय २४) आणि मोमीन मुजाहिद मुक्तार अहमद (वय २२) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून रोख रकमेसह विविध धारदार शस्त्रे असा १ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
धुळ्यातील अनस खान हा त्याच्या मित्रासोबत एम.एच. १८, बी.एस. ०१४१ क्रमांकाच्या दुचाकीने मालेगाव येथून धुळ्याकडे १८ जानेवारी रोजी सायंकाळी येत होता. लळींग घाटात त्यांच्या दुचाकीच्या पाठीमागून दोन दुचाकीवर चार जण आले. त्यांनी चाकूचा धाक दाखवून मालेगाव येथून आणलेले २ लाख ४५ हजार ३०० रुपयांची रोख रक्कम बळजबरीने हिसकावून पोबारा केला होता. याप्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. समांतर तपास सुरू असताना मालेगाव येथील काही जणांनी ही लूट केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली. माहिती मिळताच पथकाला रवाना करण्यात आले.
मालेगाव येथील कलेक्टर पट्टा भागात राहणारा चेतन परदेशी याला त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या चौकशीतून आणखी काही त्याच्या साथीदारांची नावेदेखील समोर आली. यात लागलीच पथकाने मोमीन मुजाहीद मुक्तार अहमद यालाही ताब्यात घेतले.
या दोघांनी लूट केल्याची कबुली पोलिसांना दिली. चेतन याच्या ताब्यातून १३ हजार रुपये रोख, १ लाखाची दुचाकी, ४० हजारांचा गावठी कट्टा, २ हजारांचे २ जिवंत काडतूस, १० हजारांचा मोबाइल असा १ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तर मोमीन याच्याकडून ६ हजार रुपये रोख, १० हजारांचा मोबाइल असा एकूण १६ हजारांचा ऐवज जप्त केला. असा एकूण जप्त केलेला ऐवज १ लाख ८१ हजारांचा आहे. अटकेतील दोघांवर मालेगाव पोलिस ठाण्यात यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत.पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.