अर्थे : कोरोनाने ग्रामीण भागात वेगाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. तालुक्यात दररोज रुग्ण सापडत असले, तरीही ग्रामीण भागातील तरुणांना याचे फारसे गांभीर्य नाही. अनेक नागरिक दुखणे अंगावर काढत असून, दवाखान्यात दाखल केले जाण्याच्या भीतीने कोविड चाचणीपासून पळ काढत आहेत. यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनावाहक रुग्ण असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तालुक्यातील ग्राम दक्षता समित्या थोड्याफार प्रमाणात कार्यरत असल्या, तरी काही अपवाद वगळता इतर ठिकाणी रुग्ण ‘निघाल्यावर बघू’च्या भूमिकेत आहेत. गावात साथीचा शिरकाव होऊ नये, म्हणून उपाययोजना करण्यात उदासिनता आहे. ग्रामस्थ नियम पाळत नाहीत, मास्कविना त्यांचा सर्वत्र वावर दिसून येतो. लोक आमचं ऐकत नाहीत, अशी ओरड मात्र ग्राम दक्षता समितीचे सदस्य करतात. एका घरातील सर्व सदस्यांना कोरोनाची लागण होत आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत असले, तरी येथील तरुण ना मास्क लावत, ना फिजिकल डिस्टन्स पाळताना दिसत आहेत. खरे म्हणजे त्यांनी या साथीच्या आजाराचा गावात शिरकाव रोखणे व हद्दपार करणे या विषयात महत्त्वाची भूमिका घेणे आवश्यक आहे. पण, तेच गंभीर न होता बेजबाबदारपणे वागत आहेत.