ऑनलाइन लोकमतसाक्री, दि. ७ - शासनाने पुरवलेल्या टॉनिकच्या बाटल्या साक्री शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या जवळ असलेल्या नाल्यात बेवारस स्थितीत फेकून दिल्याचे शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, या औषधी आम्ही पुरविली नसल्याचा दावा जिल्हा परिषद प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. यासंदर्भात माहिती मिळताच, जिल्हा परिषदेचे महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. आर. तडवी, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. तेव्हा त्यांना नाल्यात फ्रूटीन नावाचे प्रत्येकी १०० मिलीलीटर सिरप असलेल्या एकूण ३९२ बाटल्या आढळून आल्या. या सिरपवर उत्पादनाची तारीख जुलै २०११ अशी होती. तर मुदत समाप्तीची तारीख जुलै २०१४ अशी होती. म्हणजे आज औषधाची मुदत संपून २ वर्ष होत आली आहेत. या बाटलीचा उपयोग महाराष्ट्र शासन करेल, असे म्हटले आहे. याचाच अर्थ हे औषध जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, किंवा आदिवासी विकास विभागाने पुरविल्याचा संशय आहे. या संदर्भात साक्रीच्या ग्रामीण रुग्णालयात चौकशी केली असता, तेथे औषधे पुरवणारे स्टोअर किपर उपस्थित नसल्याने माहिती मिळू शकली नाही. धुळे जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाकडे चौकशी केली असता, जिल्हा परिषदेने २ हजार बाटल्या ८ मार्च २०११ मध्ये जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरवल्या होत्या. परंतु, ज्या बाटल्या आढळून आल्या, त्या बाटल्यांवरील बॅच नंबर वेगळा असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता या प्रकरणाचा गुंता वाढला आहे.
साक्री शहरात बेवारस स्थितीत औषधे सापडली
By admin | Published: January 07, 2017 9:29 PM