ऑनलाइन लोकमतसाक्री, जि. धुळे, दि. 30 - दोन कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेली पंचायत समितीच्या नवीन इमारतीमध्ये उद्घाटन न करता कार्यालय तडकाफडकी हलवण्यात आले आहे. जि.प.चे सीईओ गंगाथरन देवराजन यांनी आदेश दिल्याने ही किमया घडली असून जुन्या कार्यालयातील सामान नवीन कार्यालयात हलवताना अधिकारी व कर्मचा:यांची चांगलीच दमछाक होत आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून कामकाज ठप्प पडल्याचे दिसत आहे. जुन्या इमारतीमधून नवीन इमारतीमध्ये सर्व दप्तर व फर्निचर हलवण्यासाठी स्वत: कर्मचारी व अधिकारी घाम गाळत आहेत. सामान व फाईली व्यवस्थित लावण्यासाठी दुसरी यंत्रणा अस्तित्वात नसल्यामुळे सर्व खाते प्रमुख व कर्मचा:यांना यासाठी दक्षता घ्यावी लागत आहे. नवीन प्रशासकीय इमारत भव्य-दिव्य असली तरीही कर्मचा:यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण काही विभागांना जागा अपुरी पडत असल्याने व हवा, प्रकाश खेळती नसल्याने ब:याच खोल्यांमध्ये अंधार दिसून येतो. कार्यालय नवीन इमारतीमध्ये गेल्याने तेथे वीज पुरवठा सिंगल फेजच असल्याने सर्वच संगणक संथ गतीने तर काही बंद पडलेले दिसून आले. नवीन इमारतीमध्ये जातांना प्रत्येक खाते प्रमुखाला आपले सर्व फर्निचर व सामान स्वत:च लावावा लागत आहे. सद्य:स्थितीत भारनियमन सुरू असल्याने कर्मचारी व अधिकारी घामाघूम होत आहेत. शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकारी बी. बी. भिल हे आज स्वत:च टेबल हलवताना दिसून आले. शिक्षण विभागाची स्वतंत्र इमारत असताना यांनाही नवीन इमारतीच्या छताखाली येण्याचे आदेश दिले आहेत. इमारत तयार होऊन एक वर्ष पूर्ण होत आले होते. यामुळे नवीन इमारतीमध्ये कामकाज सुरू करावे, अशी मागणी होत होती. परंतु, राज्यात शिवसेना, भाजपाचे सरकार व जिल्हा परिषदेत कॉँग्रेसची सत्ता यामुळे उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचे? हा मोठा पेच पडला होता.
स्थलांतराच्या घाईत साक्री पं.स.चे कामकाज ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2017 11:47 AM