लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : पुणे येथील पिंपरी-चिंचवड परिसरातून इनोव्हा गाडी चोरी झाल्याची घटना घडली होती़ दरम्यान, वायरलेसद्वारे सांगवी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी महामार्गावरील हाडाखेड तपासणी नाक्यावर नाकाबंदी करून ही संशयित चोरटे न थांबता पसार झालेत़ मात्र पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून चोरून आणलेली गाडीस अखेर पकडली़ पंजाब राज्यातील तिघे चोरट्यांना जेरबंद करण्यात आले आहे़पुणे येथील ट्रक व्यावसायिक विशाल परमानंद ओझा रा़ जगन्नाथ कॉम्प्लेक्स, फ्लॅट नंबर १५ पुणे रोड चिंचवड स्टेशन येथे राहतात़ शनिवारी रात्रीच्या सुमारास घरासमोर उभी केलेली इनोव्हा गाडी क्रमांक एमएच १४ डीटी ७३५३ अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली़ याबाबत १० रोजी निगडी पोलिस ठाण्यात ६ लाख रूपये किंमतीची गाडी चोरून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली़ गुन्हा दाखल होताच पिंपरी-चिंचवड येथून पोलीस कंट्रोल रूम धुळे येथे वायरलेसने माहिती देण्यात आली़ त्यावरून कंट्रोल धुळे येथून सांगवी पोलिस स्टेशनचे सपोनि किरणकुमार खेडकर यांना सदर गाडी बाबत माहिती देण्यात आली़ त्यामुळे त्यांनी लागलीच १० रोजी रात्री महामार्गावरील हाडाखेड तपासणी नाक्यावर नाकाबंदी केली़ सपोनि खेडकर यांच्यासह पोलिस हवालदार शामसिंग वळवी, संजीव जाधव, संदीप शिंदे अशांनी संशयित वाहनांची तपासणी केली़ त्याचवेळी एक संशयित वाहन शिरपूरकडून येतांना दिसले, त्यावरून त्या गाडीस थांबण्याचा इशारा केला असतांना देखील संबंधित चालकाने गाडी न थांबविता सुसाट वेगाने पळ काढला़ त्यामुळे पोलिसांना अधिकच संशय आल्यामुळे त्यांनी सिनेस्टाईल गाडीचा पाठलाग केला़ काही किमी अंतरावरील पनाखेड गावाजवळ चोरून आणलेल्या गाडीस ओव्हरटेक करून पोलिसांनी त्या गाडीस थांबविले़ गाडीचा चालकासह अन्य गाडीतील दोघांची चौकशी केली असता सुरूवातीला उडवाउडवीचे उत्तरे त्यांनी दिलीत़ गाडीचे कागदपत्रे मागितली असता त्यांनी दिली नाहीत़ पोलिसांनी खाक्या दाखविताच गुन्ह्यांची कबुली चोरट्यांनी दिली़चोरून आणलेला वाहनाची नंबर प्लेट पाहता एम़एच़१४-डीटी-७३५३ असे दिसून आले़ चोरीस गेलेल्या वाहनाचा नंबर आणि थांबविलेला वाहनाचा नंबर एकच दिसून आल्याने गाडीसह तिघांना पोलिसांनी जेरबंद केले़ संशयितांना सांगवी पोलिस ठाण्यात आणल्यावर निगडी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड पुणे यांच्याशी संपर्क केला़ त्यावेळी महिला पोलीस उपनिरीक्षक वाघमारे यांच्याशी फोनवर संपर्क करून आपल्याकडील चोरीस गेलेली इनोव्हा कार व संशयित इसम सांगवी पोलीस स्टेशनला थांबवून ठेवले असल्याचे सांगण्यात आले़ त्यांची चौकशी करण्यात आली़ तिघांना सोपविले पुणे पोलिसांकडेसंशयितांनाकडून ४ मोबाईल व रोख ५३ हजार रूपये मिळून आले़ देवेंद्रसिंग जोता सिंग (२८, रा़ विखीविंड ता़पट्टी जि़ तरण -तारण, अमनदीप बबलू राम कुमार (३४, रा़ विखीविंड ता़ पट्टी जि़ तरण-तारण) व अमनवीर साहेबसिंग (२२, रा़ शेगपुरा ता़ पट्टी जि़ तरण-तारण) असे तिघांना जेरबंद करण्यात आले़ हे तिघे पंजाब राज्यातील आहेत़ गाडीसह तिघे चोरट्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पुणे पोलिसांकडे अधिक तपासासाठी पाठविण्यात आले आहे़