धुळे : विवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या मंडळीविरुध्द धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता़ यात ८ साक्षीदारांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्याने पाच जणांना २ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व दंड धुळे न्यायालयाने ठोठावला़ सहायक सरकारी वकील गणेश वाय़ पाटील यांनी प्रभावीपणे बाजू मांडली़२२ एप्रिल २०१३ ते २६ जून २०१४ या कालावधीत वेळोवेळी मयत प्रियंका दिनेश अहिरे हिच्या चारित्र्यावर संशय घेतला़ शारीरिक व मानसिक त्रास देवून शिवीगाळ व दमदाटीही केली़ सततच्या त्रासाला आणि जाचाला कंटाळून प्रियंका अहिरे या विवाहितेने आत्महत्या करीत आपले जीवन संपविले होते़ ही घटना धुळे तालुक्यातील तरवाडे गावात घडली होती़ याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणातील संशयित प्रियंकाचा पती दिनेश प्रल्हाद अहिरे, सासरे प्रल्हाद पुंजूराम अहिरे, सासू शोभाबाई प्रल्हाद अहिरे, दीर नरेंद्र प्रल्हाद अहिरे, नणंद मंदाबाई अशोक अहिरे यांच्या विरुध्द भादंवि कलम ३०४ (ब), ४९८ (अ), ३२३, ५०४ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़ गुन्ह्याच्या तपासानंतर संशयित आरोपींविरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आले होते़या प्रकरणाचे कामकाज जिल्हा व सत्र न्यायाधीश ए़ डी़ क्षिरसागर यांच्या न्यायालयात पार पडले़ याप्रकरणी सरकार पक्षातर्फे ८ साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या़ न्यायालयाने साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरुन संशयित पाचही जणांना दोषी धरले़ त्यांना २ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि १ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे़ या निकालाकडे लक्ष लागून होते़
सासरच्या लोकांना सक्तमजुरीची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 10:32 PM