आॅनलाईन लोकमत
तिसगाव, जि.धुळे, दि.१९ - धुळे तालुक्यातील वडेल शिवारात सोमवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास खेळत असताना रत्ना (७) व शीतल अर्जुन हाके (५) या दोन्ही सख्या बहिणी पाय घसरून विहिरीत पडल्या. आपल्या चिमुकल्या मुलींना वाचविण्यासाठी मातेने क्षणाचाही विलंब न करता विहिरीत उडी मारली. मात्र त्या मातेचे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि या घटनेत दोन्ही मुलींचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
धुळे तालुक्यात वडेल गाव आहे. या गावात राहणारे अर्जुन हाके यांचे गावातील शिवारातच शेत आहे. सोमवारी सकाळी अर्जुन यांच्या पत्नी भागाबाई या रत्ना व शीतल या दोन्ही मुलींसोबत त्यांच्या शेतात गेल्या होत्या. त्यावेळी भागाबाई या शेतात कापसाची निंदणीचे काम करत होत्या. त्याच वेळी त्यांच्या दोन्ही मुली विहीजवळ खेळत होत्या. दुर्देवाने त्यांचा पाय निसटल्याने त्या विहिरीत पडल्या. त्या विहिरीत पडत असताना भागाबाई यांचे लक्ष गेले. त्यांनी त्यांच्या हातातील काम बाजूला ठेऊन विहिरीकडे धाव घेतली. त्यावेळी त्यांच्या दोन्ही चिमुरड्या मुली या विहिरीतील पाण्यात गटांगळ्या खात होत्या. त्याचवेळी इतरांकडून मदतीची अपेक्षा न ठेवता भागाबाई यांनी जीवाची पर्वा न करता विहिरीत उडी घेतली. परंतु, त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठेवले.
हा प्रकार घडल्यानंतर शेतात काम करत असलेले समाधान शिवराम हाके यांनी विहिरीजवळ भागाबाई व त्यांच्या दोन्ही मुली पडल्याचे पाहून आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी गावातील नाना नामदेव माने हेदेखील तेथे पोहचले. त्यांनी विलंब न करता विहिरीत उडी मारली. पाण्यात उतरल्यानंतर त्यांनी भागाबाई यांना वाचवले.
सकाळी नऊ वाजता रत्ना अर्जुन हाके हिचा मृतदेह शोधण्यात यश आले. या घटनेची माहिती गावात वाºयासारखी पसरल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली. शीतलला शोधण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. परंतु, ती विहिरीतील पाण्यात आढळून आली नाही. विहिरीच्या अगदी तळाशी ती गेली होती. त्यामुळे दुपारी तीन वाजता तिचा मृतदेह काढण्यात यश आले. दोन्ही मुलींचा मृतदेह पाहून भागाबार्इंनी हंबरडा फोडला.