लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दोन दिवसांनी करवसुली विभागाला नवीन मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते़ त्यानुसार २५ दिवसात वसुली विभागाने ५ हजार ५७८ नवीन मालमत्ता शोधल्याची माहिती सहायक आयुक्त अभिजित कदम यांनी दिली़शहरात सातत्याने नवीन बांधकामे होत असूनही मनपाच्या दप्तरी नोंद असलेल्या मालमत्तांची संख्या वाढत नाही़ मनपा अस्तित्वात आल्यापासूनच्याच आकडेवारीच्या आधारे कामकाज सुरू असते़ त्यामुळे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी १४ जूनला करवसुली विभागाची बैठक घेऊन प्रत्येक वसुली लिपिकाने आपापल्या भागातील नोंद नसलेल्या मालमत्तांचे सर्वेक्षण करून ३० जूनपर्यंत अहवाल मागितला होता़ परंतु ३० जूनपर्यंत अहवाल सादर न झाल्याने आयुक्तांनी मुदतवाढ देऊन सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते़ त्यानुसार २५ दिवसात ५ हजार ५७८ मालमत्ता शोधण्यात आल्या असून, ही मोहीम सुरूच राहणार असल्याचेही सांगण्यात आले़ या सर्वेक्षणाबाबत विचारणा झाली असता वसुली निरीक्षकांनी सहायक आयुक्तांना पत्र देऊन कामकाजातील त्रुटींचा तपशील मांडला होता़ त्यानंतर सहायक आयुक्त अभिजित कदम यांनी तीन वसुली निरीक्षकांना बडतर्फ करण्याच्या नोटिसादेखील बजावल्या होत्या़ त्यानुसार आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सोमवारी पुन्हा आढावा बैठक घेऊन प्रत्येक वसुली निरीक्षकाचे म्हणणे ऐकून घेतले व त्यानुसार मालमत्तांचे सर्वेक्षण सुरू ठेवण्याचे आदेश दिले़ करवसुली विभागातील ७० कर्मचाºयांकडून हे सर्वेक्षण करवून घेतले जात आहे़ मनपाचे तत्कालीन आयुक्त डॉ़ नामदेव भोसले व संगीता धायगुडे यांच्या कार्यकाळातदेखील नवीन मालमत्ता शोधण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती़ त्या वेळीदेखील ५ हजार नवीन मालमत्ता शोधण्यात आल्या होत्या़ परंतु सध्या सर्व नवीन मालमत्तांची केवळ यादी तयार होत असून त्यात नवीन, वाढीव मालमत्तांचा समावेश आहे़ सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर शोधण्यात आलेल्या मालमत्तांची प्रत्यक्ष मोजणी करून त्यांना कर आकारणी होणार आहे़
५ हजार मालमत्तांचा शोध!
By admin | Published: July 12, 2017 1:00 AM