धुळे : नववी अनुत्तीर्ण झाल्यामुळे शाळाबाह्य झालेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्याचे काम शिक्षण विभागाने सुरू केले आहे. त्यामुळे सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षी इयत्ता नववीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांची माहिती सरल प्रणालीमध्ये विद्यार्थी पोर्टलमध्ये भरण्याचे आदेश राज्यस्तरावरून देण्यात आले आहेत. यामध्ये शाळा सोडून गेलेला विद्यार्थी कोठे गेला? इयत्ता दहावीला १७ नंबर फॉर्म आहे काय? मयत किंवा दुसरीकडे स्थलांतरित झाला याबाबतची विद्यार्थ्यांची माहिती राज्यस्तरावरून भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नाचाच भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.शैक्षणिक वर्ष २०१५-१६ या वर्षी अनुत्तीर्ण झालेल्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या शाळाबाह्य होण्याच्या कारणांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. यावर शासकीय, शालेय तसेच सामाजिक स्तरावर प्रयत्न करण्यात येणार आहेत. या मुलांच्या शाळाबाह्य होण्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने सरल प्रणालीत स्टुडंट पोर्टलवर माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही माहिती कशा प्रकारे भरावी याबाबत विस्तारित माहितीही शिक्षण विभागाने दिलेली आहे.
नववी अनुत्तीर्ण झालेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध
By admin | Published: March 24, 2017 12:13 AM